Char dham Yatra 2021 : उत्तराखंडमध्ये 14 मे या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मंदिरांची कवाडं खुली होण्यासोबतच चारधाम यात्रेला प्रारंभ होणार आहे. कोरोना संसर्गाचं घोंगावणारं संकट पाहता यंदाच्या वर्षी यात्रेकरुंना यात्रेसाठी बंदी घालण्यात आली आहे. असं असलं तरीही निर्धारित दिवसांना चारधाम तीर्थक्षेत्रांची कवाडं खुली होणार आहेत. 
मंगळवारी याचसंदर्भातील नवी मार्गदर्शक कार्यप्रणाली चारधाम देवस्थान व्यवस्थापकीय बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविनाथ रमण यांनी प्रसिद्ध केली. ज्याअंतर्गत दररोज सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच मंदिराचे द्वार खुले असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


कोणत्या दिवशी उघडणार मंदिराचे द्वार? 


चारधामपैकी यमुनोत्री धामची कवाडं 14 मे रोजी दुपारी 12.15 मिनिटांनी उघडणार आहेत. तर, गंगोत्री धामची कवाडं 15 तारखेला सकाळी 7.31 वाजता खुली होणार आहेत. केदारनाथ धाम येथील कवाड 17 मे रोजी पहाटे 5 वाजता आणि बद्रीनाथ धामचे द्वार 18 मे रोजी पहाटे 4.15 मिनिटांनी खुले होणार आहेत. 




WB post-poll violence : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबबात संजय राऊत यांच्याकडून चिंता व्यक्त 






सांकेतिक रुपांत उघडणार कवाडं 


चारधाम यात्रेला अंदाजात ठेवत निर्धारित तिथी आणि तारखांवर मंदिरांची कवाडं सांकेतिक स्वरुपात खुली करण्यात येतील. गढवाल आयुक्त आणि उत्तराखंड देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मंदिरातील पुजेसाठी येणारे पुरोहित आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट पाहिल्यानंतरच इथं प्रवेश देण्यात येणार आहे. प्रत्येक मंदिरापाशी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून, इथं परंपरागत पूजा सुरुच असेल. पण, श्रद्धाळूंना मात्र यंदा यात्रेत सहभागी होता येणार नाही. 


दरम्यान, कोरोनाचं संकट अधिक गडद होताना पाहून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी म्हणून यात्रा रद्द करण्याच्या निर्णाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.