IPL 2021 Schedule : लवकरच आयपीएलच्या 14व्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार असून आयपीएल 2021 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, यंदा आयपीएलचं आयोजन भारतातच करण्यात येणार आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या मोसमाला सुरुवात होणार आहे. तसेच 30 मे रोजी अहमदाबाद येथे आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या 14व्या मोसमातील सामन्यांचं आयोजन अहमदाबाद, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, मुंबई, कोलकात्यात होणार आहे.


IPL 2021 चा उद्घाटनाचा सामना चेन्नईत खेळवला जाईल. आयपीएलमधील सलामीचा सामना पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या खेळवण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं बीसीसीआयनं आयपीएलसाठी सहा स्टेडियम्सची निवड केली आहे. यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचाही समावेश आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफ आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.





आयपीएल 2021 मध्ये आठ संघ असतील. तसेच एकूण 56 सामने खेळवण्यात येतील. चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूत प्रत्येकी 10 सामने रंगतील. तर अहमदाबाद आणि दिल्लीत प्रत्येकी 8 सामने होतील. यंदाच्या आयपीएलमध्ये होम ग्राऊंड नसेल. म्हणजेच कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नाहीत. सर्व संघांचे सामने त्रयस्थ ठिकाणी होतील. प्रत्येक संघाला 6 स्टेडियमपैकी 4 स्टेडियम्सवर खेळण्याची संधी मिळेल.


आयपीएल 2021 मध्ये 11 डबल हेडर सामने खेळवण्यात येतील. म्हणजे एकाच दिवशी दोन सामने खेळवले जातील. दुपारचे सामने साडे तीन वाजता सुरु होतील. तर संध्याकाळचे सामने साडे सात वाजता सुरु होतील. गेल्याच वर्षी बीसीसीआयनं यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन केलं होतं. देशात कोरोनाचा प्रादर्भाव वाढल्यानं आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली गेली. यानंतर आता भारतात सुरक्षितपणे स्पर्धा आयोजित करण्याचा विश्वास बीसीसीआयनं व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :