मुंबई : ख्रिस मॉरिस हा आयपीएलमधला आजवरचा सर्वात महागडा क्रिकेटर ठरला. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसतानाही कृष्णाप्पा गौतमनं आजवरची सर्वात मोठी बोली लागलेला क्रिकेटर हा मान मिळवला. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं गौतमवर तब्बल सव्वा नऊ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली.


कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामधल्या चढाओढीनं गौतमची किंमत सात कोटींच्यावर पोहोचली होती. तिथून कोलकात्यानं माघार घेतली. पण चेन्नईनं या चढाओढीत उशिरानं एण्ट्री घेऊन ती बाजी जिंकली. 2018 आणि 2019 या दोन मोसमात राजस्थानकडून खेळलेला गौतम गेल्या मोसमात पंजाबकडून खेळला. ऑफ स्पिन गोलंदाजी ही त्याची खासियत असली तरी हाणामारीच्या षटकांत षटकार ठोकणारा फलंदाज म्हणूनही त्याची दहशत आहे. चेन्नईला रवींद्र जाडेजाच्या साथीनं असला फलंदाज हवा होता.


कृष्णाप्पा गौतमइतकाच भारतीय क्रिकेटमध्ये तामिळनाडूच्या शाहरुख खानचा दबदबा आहे. यंदाच्या मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी ट्वेन्टीत शाहरुखनं आपल्या तडाखेबंद फलंदाजीची प्रचिती सातत्यानं दिली आहे. त्यामुळंच प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सनं शाहरुख खानवर सव्वा पाच कोटींची दौलतजादा केली आहे.


केदार जाधवच्या बुडत्या करीयरला सनरायझर्स हैदराबादकडून आधार मिळाला आहे. गेल्या मोसमातल्या निराशाजनक कामगिरीनंतर चेन्नईनं त्याला आपल्या कॉण्ट्रॅक्टमधून मोकळं केलं होतं. लिलावाच्या पहिल्या फेरीत केदारवर कुणी बोलीच लावली नाही. पण एक बहुगुणी शिलेदार या नात्यानं हैदराबादनं त्याला दोन कोटींच्या मूळ किंमतीमध्येच विकत घेतलं.


बंगलोरनं कॉण्ट्रॅक्टमधून मोकळं केलेल्या उमेश यादवचं दिल्ली कॅपिटल्सनं भलं केलं. दिल्लीनं त्याच्यावर एक कोटींची बोली लावली.


मुंबई इंडियन्सकडून चेन्नई सुपर किंग्समध्ये गेलेला हरभजनसिंग आता कोलकात्याच्या ताफ्यात सामील झाला आहे. चेन्नईनं त्याला आपल्या कॉण्ट्रॅक्टमधून मोकळं केलं होतं. भज्जीचं वय आणि उतरणीला लागलेलं करीयर पाहता कोलकात्यानं दोन कोटी मोजून त्याचं उखळ आणखी पांढरं केलं असं म्हणता येईल.


सौराष्ट्रचा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकरियाही आयपीएलच्या लिलावात करोडपती झाला. राजस्थान रॉयल्सनं त्याच्यावर एक कोटी वीस लाखांची बोली लावली. एका टेम्पो ड्रायव्हरचा लेक असलेल्या चेतन सकरियासाठी ही मोठी संधी ठरावी.


चेतेश्वर पुजारा आणि करुण नायर या कसोटी क्रिकेटचा शिक्का असलेल्या फलंदाजांना या लिलावात तारणहार मिळाला. चेन्नईनं पुजारावर, तर कोलकात्यानं नायरवर 50 लाखांची बोली लावली.


आयपीएलच्या या लिलावात नव्या उमेदीच्या गुणवत्तेला संधी मिळाली. सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन आणि केरळचा सलामीचा फलंदाज मोहम्मद अझरुद्दिन यांच्यासह 23 खेळाडूंवर वीस लाखांची बोली लागली. अर्जुनसाठी मुंबई इंडियन्सची बोली म्हणजे घरचाच मामला होता. कारण आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्सचंच प्रतिनिधित्व केलं होतं. आणि अर्जुन एक नेट बोलर म्हणून मुंबई इंडियन्सच्याच ताफ्यात होता.


एकंदरीत काय, तर आयपीएलच्या या लिलावानं कालची, आजची आणि उद्याची गुणवत्ताही प्रकाशझोतात आणली आहे.


संबंधित बातम्या :



IPL 2021 Captain Salary: विराट कोहली ते महेंद्रसिंह धोनी... आयपीएलमधील कर्णधारांना किती मानधन मिळतं?