IPL 2021 : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने स्टीव्ह स्मिथबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ आगामी आयपीएलमध्ये खेळणार की, नाही? यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मायकल क्लार्क म्हणाला की, "आयपीएल 2021 मध्ये कमी किंमत मिळाल्यामुळे स्टीव्ह स्मिथ दुखापतीचं कारण पुढे करत या सीझनमधून माघार घेऊ शकतो. स्मिथला दिल्ली कॅपिटल्सने 2.20 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. यंदाच्या सीझनसाठी स्मिथची बेस प्राइज दोन कोटी रुपये होती. लिलावात स्मिथवर पहिली बोली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लावली होती, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 लाख रुपयांची भर घालून दुसरी बोली लावली. त्यानंतर स्मिथवर इतर कोणीही बोली न लावल्यामुळे केवळ 2.20 कोटी रुपयांमध्ये स्मिथ दिल्लीच्या संघात दाखल झाला.


स्मिथला राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2018 च्या लिलावात 12.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं आणि आयपीएल 2020 मध्ये स्मिथ राजस्थान रॉयल्सकडून कॅप्टन म्हणून खेळला होता. दरम्यान, स्मिथ फारशी चांगली खेळी करु शकला नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2021 च्या लिलावाआधी त्याला रिलीज केलं. राजस्थानने आगाम सीझनसाठी संजू सॅमसनच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.


ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्ट पॉडकास्टमध्ये म्हटलं की, "मला माहिती आहे की, स्टीव्ह स्मिथ टी20 मध्ये फारशी चांगली खेळी करु शकला नव्हता. तो गेल्या आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करु शकला नाही. परंतु, मी हैराण आहे की, त्याच्यावर फार कमी बोली लावली गेली. गेल्या वर्षी तो ज्या किमतीला विकला गेला होता आणि ज्या भूमिकेत खेळत होता, तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. अशातच जर भारतासाठी रवाना होण्यापूर्वी जर त्याला हॅमस्ट्रिंग झालं, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही."


स्मिथने आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये 14 सामन्यांत 311 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. क्लार्क म्हणाला की, "तुम्ही जर स्टीव्ह स्मिथबाबत बोलत असाल, तर जरी तो जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज नसेल, परंतु, त्याची कामगिरी वाईटही नाहीये. विराट कोहली जर नंबर - 1 असेल, तर तोदेखील टॉप 3 मध्ये सहाभागी आहे."


महत्त्वाच्या इतर बातम्या :