IPL 2020 : आयपीएलच्या आणखी एका रोमांचक सामन्यात काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मुंबई इंडियन्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात बंगलोरनं मुंबईला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ईशान किशन आणि कायरन पोलार्डच्या 119 धावांच्या झुंजार भागीदारीनंतरही मुंबईचा संघ विजयापासून अवघी एक धाव दूर राहिला. ईशाननं 99 तर पोलार्डनं नाबाद 60 धावा फटकावल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मुंबईला सहाच धावा करता आल्या. बंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि डिव्हिलियर्सनं सात धावा पार करुन यंदाच्या मोसमातला दुसरा विजय साजरा केला.


त्याआधी अॅरॉन फिंच, एबी डिव्हिलियर्स आणि देवदत्त पडिक्कलच्या अर्धशतकांमुळे बंगलोरनं तीन बाद 201 धावांचा डोंगर उभारला. फिंच आणि पडिक्कलनं 81 धावांची सलामी दिली. फिंच 52 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पडिक्कल आणि डिव्हिलियर्सनंही अर्धशतकी भागीदारी साकारली. पडिक्कलनं 40 चेंडूत 54 तर डिव्हिलियर्सनं अवघ्या 24 चेंडूत 55 धावा फटकावल्या. पण बंगलोरचा कर्णधार विराट कोहली मात्र सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो केवळ एक धाव काढून बाद झाला.


यंदाच्या मोसमातला पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबईच्या ईशान किशननं बंगलोरविरुद्ध 99 धावांची झुजार खेळी उभारली. पण वैयक्तिक शतक आणि संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. मुंबईला अखेरच्या दोन चेंडूत विजयासाठी पाच धावांची गरज असताना ईशाननं मारलेला फटका थेट डीप मिडविकेटच्या हातात विसावला. पण त्याआधी ईशाननं 58 चेंडूत 2 चौकार आणि तब्बल 9 षटकारांसह 99 धावा फटकावल्या.


मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डनं आयपीएलमध्ये आणखी एका वेगवान अर्धशतकाची नोंद केली. बंगलोरविरुद्ध पोलार्डनं अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावलं. पोलार्डनं या सामन्यात 24 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 60 धावा फटकावल्या.