दुबई - आयपीएलच्या तेराव्या मोसमाला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालंय. या वेळापत्रकानुसार गतविजेते मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपर किंग्स संघांदरम्यान 19 सप्टेंबरला अबुधाबीत सलामीचा सामना रंगणार आहे.


यंदा कोरोनामुळे बीसीसीआयकडून आयपीएलचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला सुरु होणारी ही स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यात सुरुवातीला 19 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत साखळी सामने, त्यानंतर क्वालिफायर, एलिमिनेशन राऊंड आणि 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल.





खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा होणार?


यूएईत कुठल्या शहरात आयपीएलचे किती सामने?


यूएईतल्या शारजाह, दुबई आणि अबुधाबी या शहरांमध्ये आयपीएलचे सामने


आयपीएलचे एकूण साखळी सामने - 56


दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई - 24 सामने


शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी - 20 सामने


शारजाह क्रिकेट स्टेडियम - 12 सामने


सामन्यांच्या वेळेत बदल


आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. आधी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता होणाऱ्या सामन्यांची वेळ बदलून ती साडेसात वाजता करण्यात आली आहे. तर दुपारचे सामने हे चारऐवजी साडेतीन वाजता सुरु होणार आहेत.


है तय्यार हम


कोरोनामुळे आयपीएलच्या तयारीसाठी 22 ऑगस्टलाच आठही संघ अबुधाबी आणि यूएईत दाखल झाले होते. त्यापैकी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स अबुधाबीत तर उर्वरित सहा संघ दुबईत वास्तव्यास आहेत. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर या आठही संघांचा सध्या कसून सराव सुरु आहे.


चेन्नई सुपर किंग्सला सुरुवातीलाच तीन धक्के


महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीआधीच तीन मोठे धक्के बसले आहेत. सर्वात आधी चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी खेळाडू सुरेश रैना कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला. त्यानंतर सीएसकेच्या दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंसह नेट बोलर्स आणि सपोर्ट स्टाफसह एकूण तेरा जणांना कोरोनाची लागण झाली होती. हे तेराही सदस्य निगेटिव्ह आल्यानंतर सीएसकेला तिसरा धक्का बसला तो म्हणजे ऑफ स्पिनर हरभजन सिंगनंही वैयक्तिक कारणामुळे यंदा आयपीएल खेळणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे धोनीच्या यलो आर्मीकडे यंदा क्रिकेट चाहत्यांचं खास लक्ष राहील.