IPL 2020 : दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएल 2020 चा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने दिल्लीवर मात करत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज मार्कस स्टायनिसचा विकेट घेतला. या विकेटसोबतच बोल्टने आयपीएलमध्ये एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.


आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, एखाद्या गोलंदाजाने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतला आहे. एवढंच नाहीतर बोल्टने आपल्या टी20 करियरमध्ये पहिल्यांदाच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर एखाद्या खेळाडूला आऊट केलं आहे.





दरम्यान, या सीझनमध्ये बोल्ट शानदार फॉर्मात दिसून आला असून तो पावर प्लेचा गोलंदाज म्हणून सर्वांसमोर आला. त्याने या सीझनमध्ये आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये एकूण आठ विकेट्स घेतले. त्याचसोबत टूर्नामेंटमध्ये पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.


बोल्टने या सामन्यात मुंबईसाठी उत्तम खेळी केली आणि आपल्या चार ओव्हर्समध्ये 30 धावा देत तीन महत्त्वाचे विकेट्स घेतले आहेत. त्याचसोबत बोल्टच्या नावावर आयपीएल 2020 मध्ये 25 विकेट्स आहेत. बोल्ट या सीझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे.


दरम्यान,  मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरलं आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव केला आहे. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकीय खेळी केली. तर त्याआधी ट्रेंट बोल्ट आणि नॅथन कुल्टर नाईल उत्कृष्ट गोलंदांजी करत दिल्लीचा डाव 156 धावांवर रोखला.


मुंबईकडून ट्रेंट बोल्टने शानदार गोलंदाजी करत चार षटकांत 30 धावा देऊन तीन बळी घेतले. तर नॅथन कुल्टर नाईलला दोन आणि जयंत यादवने एक विकेट घेतली. पर्पल कॅपच्या शर्यतील असलेल्या जसप्रीत बुमराहला मात्र एकही विकेट घेता आली नाही.


महत्त्वाच्या बातम्या :