IPL 2020 Final, MIvsDC : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरलं आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव केला आहे. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकीय खेळी केली. तर त्याआधी ट्रेंट बोल्ट आणि नॅथन कुल्टर नाईल उत्कृष्ट गोलंदांजी करत दिल्लीचा डाव 156 धावांवर रोखला.
मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 51 चेंडूत 68 धावांची निर्णायक खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. ईशान किशनचे 19 चेंडूत 33 धावा करत त्याला साथ दिली. क्विंटन डिकॉकने 12 चेंडूत 20 धावा, सूर्यकुमार यादनवने 20 चेंडूत 19 धावा केल्या. दिल्लीकडून ऑनरिच नॉर्टजेने दोन मार्क स्टॉयनिस आणि कसिगो रबाडाने प्रत्येक एक-एक विकेट घेतली.
त्याआधी दिल्लीने प्रथम फलंदाजीनंतर मुंबई इंडियन्सला 157 धावांचे लक्ष्य दिले आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्लीत सर्वाधिक नाबाद 65 धावा केल्या. दिल्लीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण दिल्लीची सुरुवात खराब झाली. फॉर्मात असलेला मार्कस स्टॉईनिस खाते न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर तिसर्या षटकात अजिंक्य रहाणेनेही दोन धावा करुन बाद झाला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेला शिखर धवनही 12 चेंडूत केवळ 15 धावा करून बाद झाला.
तीन बाद 22 धावा अशा स्थितीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी अवघ्या 96 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने 50 चेंडूत नाबाद 65 धावांची शानदार खेळी खेळली. दुसरीकडे ऋषभ पंतने 38 चेंडूत 56 धावा केल्या. अय्यरने 6 चौकार आणि दोन षटकार लगावले. तर ऋषभ पंतने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. ऋषभ पंतच्या बाद झाल्यानंतर दिल्लीच्या धावांची गती मंदावली. दिल्लीची 15 ओव्हर्समध्ये 118 धावसंघ्या. मात्र 20 षटकात दिल्ली 156 धावाच करू शकली.
मुंबईकडून ट्रेंट बोल्टने शानदार गोलंदाजी करत चार षटकांत 30 धावा देऊन तीन बळी घेतले. तर नॅथन कुल्टर नाईलला दोन आणि जयंत यादवने एक विकेट घेतली. पर्पल कॅपच्या शर्यतील असलेल्या जसप्रीत बुमराहला मात्र एकही विकेट घेता आली नाही.