IPL 2020 | आयपीएलच्या इतिहासात सर्वोत्तम संघ चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्सचे सर्व खेळाडू आणि इतर क्रू मेंबर्सची दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आला आहे. सर्व खेळाडू आणि क्रू मेंबर्स कोरोनामुक्त झाल्याचं कोरोना चाचणीच्या अहवालातून निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आता शुक्रवारपासून धोनीची टीम प्रॅक्टिस सुरु करू शकते. त्याचसोबत आता चेन्नई सुपर किंग्स आयपीएलची ओपनिंग मॅच खेळण्याची शक्यता पुन्हा एकदा बळावली आहे.
गेल्या आठवड्यात सीएसकेच्या दोन खेळाडूंसह 13 क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर संपूर्ण संघाचा आयसोलेशन कालावधी 4 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता. त्याचसोबत धोनीच्या संघ्यावर प्रॅक्टिस सुरु करण्याआधी दोन कोरोना चाचण्या करून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तरच प्रॅक्टिसची परवानगी देणार असल्याची अटही लागू करण्यात आली होती.
गुरुवारी सीएसकेच्या संपूर्ण संघाचा कोरोनाचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल नेगेटिव्ह आला असून ते शुक्रवारपासून आपली प्रॅक्टिस सुरु करू शकतात, अशी माहिती टीम मॅनेजमेंटने दिली आहे.
ओपनिंग मॅच खेळणार सीएसके
आयपीएलच्या ट्रेंडनुसार, सीझनची सुरुवात गतवर्षीचा विजेता आणि उपविजेता संघांच्या लढतीने होते. परंतु, सीएसके संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे यंदाच्या हंगामाचा सुरुवातीचा सामना सीएसकेऐवजी दुसरा संघ खेळणार अशी चर्चा होती. परंतु, आता धोनीच्या संघाकडे प्रॅक्टिससाठी 15 दिवसांचा अवधी असल्यामुळे आता सीएसके आणि मुंबई इंडियन्समध्ये या हंगामाचा सुरुवातीचा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याआधीच सांगितलं आहे की, या हंगामातील शेड्यूल शुक्रवारी जारी करण्यात येईल. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 13वं सीझन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईत पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
आयपीएल सामन्यांची संपूर्ण यादी उद्या जाहीर होणार : सौरभ गांगुली
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा रद्द होणार IPL 2020? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले...
IPL Season 13 | बेन स्टोक्स आयपीएलमध्ये खेळण्याबाबत अनिश्चितता!