IPL 2020 : कोरोना व्हायरसमुळे अनिश्चिततेचं सावट पसरलेल्या आयपीएलच्या 13व्या सीझनला आजपासून दुबईत सुरुवात होत आहे. आयपीएलच्या इतिहासातील स्टार टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हायव्होलटेज सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
सामना आज आबुधाबीतील शेख जायेद स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. अनेक असे खेळाडू आहेत, जे अद्याप दुबईतील मैदानांवर एकही सामना खेळलेले नाहीत. आयपीएलच्या सामन्यांमध्ये ते पहिल्यांदाच दुबईतील मैदानांमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत. अशातच इतिहासात दुसऱ्यांदा आयपीएल भारताबाहेर दुबईत खेळवण्यात येत आहे. याआधी 2009मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचं आयोजन भारताबाहेर दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं. तसेत 2014मध्येही लोकसभा
निवडणुकांमध्ये आयपीएलचा फर्स्ट हाफ दुबईत खेळवण्यात आला होता.
IPL 2020, MI vs CSK Preview: पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधला नवा संघर्ष
29 मार्चपासून भारतात होणार होतं आयपीएलचं आयोजन
यंदाच्या आयपीएलच्या सीझनचं आयोजन भारतातच 29 मार्चपासून करण्यात येणार होतं. परंतु, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे यंदाच्या वर्षी आयपीएल होणार की, नाही? हा प्रश्न उपस्थित झाला होता. यंदाच्या वर्षी होणारा टी-20 विश्व कप स्पर्धेला स्थगिती मिळाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेतला. आता यूएईतील तीन शहरं अबु धाबी, दुबई, शारजाह येथील मैदानांवर आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत.
पाहा व्हिडीओ : अबुधाबीत आयपीएलचा सलामीचा सामना, Mumbai Indians VS Chennai Super Kings पहिली लढत
आयपीएल पाहण्यासाठी यंदा प्रेक्षक नसणार
यंदा मैदानावर आपल्या आवडत्या संघाच्या घोषणा नसणार किंवा आपल्या आवडत्या खेळाडूला मारलेल्या हाका ऐकू येणार नाहीत. एखाद्या खेळाडून जर चौकार किंवा षट्कार टोलावला तर त्याच्या नावाचे जयघोष ऐकू येणार नाहीत. कारण यंदाच्या सीझनमध्ये आयपीएलच्या कोणत्याच सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचे सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहेत. परंतु, आयपीएल प्रेमींनी निराश होण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला ऑनलाईन किंवा टेलिव्हिजनवर या सामन्यांचे प्रक्षेपण पाहता येणार आहे.
IPL 2020, MI vs CSK LIVE: सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
गेल्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने मिळवला होता विजय
गेल्या सीझनमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनी नेतृत्त्व करत असेल्या चेन्नई सुपर किंग्सचा यांच्यात अंतिम सामना रंगला होता. या हायव्होलटेज लढतील मुंबई इंडियन्सने विजयाला गवसणी घातली होती. त्यामुळे आयपीएलच्या परंपरेनुसार, या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघांनी अद्याप एकदाही आयपीएलचा किताब जिकलेला नाही त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये हे संघ कमाल करणार का हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :