मुंबई : अपुन की मुंबई इंडियन्स इस बार भी आयपीएल जीतेगी... मुंबईतल्या एका नाक्यावर काही मुलांमध्ये आयपीएलवरुन चाललेल्या संवादातलं हे वाक्य. आयपीएलचं बिगुल वाजल्यानंतर सर्वात जास्त चर्चा होणारे दोनच संघ. पहिला रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि दुसरा महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स.


कोरोनाच्या प्रभावामुळे यंदाचा आयपीएल सोहळा संयुक्त अरब अमिरातीत पार पडतोय. आणि या सोहळ्याचा नारळ फुटणार आहे तो गतविजेता मुंबई आणि गतउपविजेत्या चेन्नई याच दोन संघांमधल्या सामन्यानं. त्यामुळे 'शनिवार की शाम' आयपीएल आणि मुंबई-चेन्नईच्य़ा चाहत्यांसाठी खास असणार आहे.


हिटमॅनची यंग ब्रिगेड सज्ज


हिटमॅन रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समध्ये युवा खेळाडूंचा जास्त भरणा आहे. जसप्रीत बुमरा, हार्दिक-कृणाल पंड्या, राहुल चहर, ख्रिस लीन, सूर्यकुमार यादव यासारखे हुकमी एक्के रोहितच्या फौजेत आहेत. त्यांच्या जोडीला कायरन पोलार्ड, क्विंटन डी कॉक, ट्रेन्ट बोल्ट या जागतिक क्रिकेट गाजवणाऱ्या शिलेदारांचा अनुभवदेखील आहे.


डॅडीज आर्मीचा दरारा


महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये तिशीपार खेळाडूंची संख्या जास्त आहे. म्हणूनच धोनीचा संघ डॅडीज आर्मी म्हणून ओळखला जातो. स्वत: कर्णधार धोनी आणि शेन वॉटसन हे दोघंही चाळीशीकडे झुकले आहेत. लेग स्पिनर इम्रान ताहीर 41 वर्षांचा आहे. तर फाफ ड्यू प्लेसी, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, मुरली विजय, अंबाती रायडू या बिनीच्या शिलेदारांनी तिशी ओलांडली आहे. पण असं असलं तरी गेल्या दोन्ही मोसमात याच अनुभवी शिलेदारांनी संघाला अंतिम फेरी गाठून दिली आहे.


कौन किस पे भारी?


आयपीएलमध्ये 10 पैकी तब्बल आठवेळा चेन्नईनं अंतिम फेरी गाठली आहे. पण या आठपैकी केवळ तीन वेळाच विजेतेपदावर नाव कोरता आलं. पण याऊलट मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक चारवेळा विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. या चारपैकी तीन वेळा मुंबईने चेन्नईलाच अंतिम फेरीत मात दिली होती. मुंबई आणि चेन्नई संघ आयपीएलच्या मैदानात 28 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी 17 वेळा मुंबईनं तर 11 वेळा चेन्नईनं विजय साजरा केला आहे.


आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीतही मुंबई इंडियन्स आघाडीवर आहे. मुंबईनं आतापर्यंत 185 पैकी 107 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईनं 100 सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.


यूएईत चेन्नईचा जलवा


2014 साली लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचे काही सामने अमिरातीत खेळवण्यात आले होते. त्यावेळी चेन्नईनं पाचपैकी चार सामन्यात विजय मिळवला होता. यूएईतल्या मैदानात कामगिरीचा तोच आलेख आणखी उंचावण्य़ाचा धोनीच्या संघाचा प्रयत्न राहील.


लंकन किंगची माघार


श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगाची उणीव मुंबई इंडियन्सला यंदा नक्कीच जाणवेल. वैयक्तिक कारणामुळे मलिंगानं आयपीएलमधून माघार घेतली आहे. आयपीएलच्या इतिहासातला सगळ्यात यशस्वी गोलंदाज अशी मलिंगाची ओळख आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रमही मलिंगाच्याच नावावर आहे. मलिंगानं 122 आयपीएल सामन्यात 19 च्या सरासरीने सर्वाधिक 170 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आपल्या धारदार गोलंदाजीमुळे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता असणाऱ्या मलिंगाची उणीव मुंबई इंडियन्सला नक्की जाणवू शकते.


सीएसकेसमोर अडचणींचा डोंगर


तीन वेळच्या आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्सचा संघ 22 ऑगस्टला दुबईत दाखल झाला. पण दुबईत पोहोचल्यानंतर सीएसकेला पहिला मोठा धक्का दिला तो कोरोनानं. कोरोना चाचणीत दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंसह नेट गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य असे मिळून 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे सर्वजण कोरोनातून सावरत असतानाच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुरेश रैनानं तडकाफडकी दुबईतून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. हा सीएसकेसाठीचा सर्वात मोठा धक्का ठरला. कौटुंबिक कारणामुळे रैनानं आयपीएलमधून माघार घेतली असली तरी त्यामुळे चेन्नईच्या मधल्या फळीत मोठी पोकळी निर्माण झाली. रैनानंतर गेले दोन मोसम चेन्नई संघासोबत असलेल्या हरभजननंही वैयक्तिक कारण देत आयपीएल खेळत नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता या सगळ्या अडचणीतून धोनी आणि टीम कसा मार्ग काढते हे पाहणं महत्वाचं ठरेल.


कोरोनामुळे भारतीय क्रिकेट जवळपास सात महिने थांबलं होतं. त्यामुळे एवढ्या प्रदीर्घ काळानंतर भारतीय क्रिकेटमधले चेहरे आयपीएलच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या भूमिकेत दिसणार आहेत. चेन्नई-मुंबई सामना ही सुरुवात आहेत. कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. या परिस्थितीत आयपीएलच्या नव्या मोसमात या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधला हा नवा संघर्ष कसा असेल याचीच आता चाहत्यांना उत्सुकता आहे.


चलो फिर... बोलो कौन जितेगा...? चेन्नई या मुंबई...?