मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा सीजन शनिवारपासून म्हणजे 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सीजनमधील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि मागील वर्षीचा उपविजेता संघ चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाचं लक्ष आयपीएलचं पाचव्यांदा जेतेपदाकडे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर, धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज चौथ्यांदा विजेतेपद जोर लावणार आहे. गेल्या सीजनमध्ये अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाने चेन्नईला अटीतटीच्या सामन्यात पराभूत करून आयपीएल 2019 चं विजेतेपदावर नाव कोरलं होतं.
चेन्नई आणि मुंबई संघांमधील लढत नेहमीच अटीतटीची ठरलीय. क्रिकेट फॅन्स आतूरतेने या संघामधील सामन्याची वाट पाहत आहेत. आयपीएलमध्ये 10 पैकी तब्बल आठवेळा चेन्नईनं अंतिम फेरी गाठली आहे. पण या आठपैकी केवळ तीन वेळाच विजेतेपदावर नाव कोरता आलं. पण याऊलट मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक चारवेळा विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. या चारपैकी तीन वेळा मुंबईने चेन्नईलाच अंतिम फेरीत मात दिली होती. मुंबई आणि चेन्नई संघ आयपीएलच्या मैदानात 28 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी 17 वेळा मुंबईनं तर 11 वेळा चेन्नईनं विजय साजरा केला आहे.
IPL 2020, MI vs CSK Preview: पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधला नवा संघर्ष
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीतही मुंबई इंडियन्स आघाडीवर आहे. मुंबईनं आतापर्यंत 185 पैकी 107 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईनं 100 सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमधील सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमधील सामना उद्या म्हणजे 19 सप्टेंबरला असणार आहे. अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. या सामन्याचं थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर पाहता येईल.