मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनचं बिगुल वाजलं असून दोन दिवसांतच म्हणजेच, 19 सप्टेंबर रोजी या सीझनचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार आहे. आयपीएल 2020 मधील पाच सर्वश्रेष्ठ खेळाडूंबाबत जाणून घेऊयात, जे या सीझनमध्ये आपली धमाकेदार खेळी सादर करू शकतात.





1. डेविड वॉर्नर


सनराइजर्स हैदराबादसाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेविड वॉर्नर गेल्या सीझनमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. वॉर्नर यावर्षीही कमाल करू शकतो. टी20 क्रिकेटच्या 282 सामन्यांमध्ये आठ शतक ठोकत 9 हजार 276 धावा करणारा वॉर्नर यावर्षी टी20मध्ये आपल्या 10 हजार धावा पूर्ण करू शकतो. आयपीएलच्या 126 सामन्यांमध्ये वॉर्नरच्या नावावर 142.39 चा स्ट्राइक रेटसह 4,706 धावा आहेत. यामध्ये चार शतकं आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे.





2. विराट कोहली


आयपीएलच्या इतिहासात सर्वाधित धावा करणारा किंग कोहलीकडे यंदाच्या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याची संधी आहे. आयपीएल 2016 मध्ये कोहलीने फक्त एका सीझनमध्ये चार शतक ठोकत इतिहास रचला होता. कोहलीचे फॅन्सना पुन्हा एकदा कोहलीकडून अशाच दमदार खेळीची अपेक्षा आहे. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मैदानापासून दूर राहणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये 281 सामन्यांमध्ये 8900 धावा आहेत, ज्यामध्ये पाच शतकांचा समावेश आहे.





3. पॅट कमिंस


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारा वेगवान गोलंदाज आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला कोलकत्ता नाईट रायडर्सने आयपीएल 2020 च्या लिलावात 15.50 कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतलं आहे. टी20 क्रिकेटमधील 82 सामन्यांत 97 विकेट्स घेणाऱ्या कमिंस दुबई आयपीएल गाजवू शकतो.





4. ड्वेन ब्रावो


टी20 क्रिकेटमध्ये आपले 500 विकेट्स पूर्ण करणारा जगभरातील एकमेव गोलंदाज ड्वेन ब्रावो आयपीएल 2020 मध्ये वादळी खेळी करू शकतो. ड्वेन ब्रावो आपल्या धमाकेदार खेळीने इतर संघाच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. आयपीएलच्या 134 सामन्यांमध्ये 147 विकेट्स घेणारा ब्रावो दोन वेळा या टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.





5. 'यूनिवर्स बॉस' क्रिस गेल


आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खतरनाक फलंदाजांपैकी एक असलेल्या क्रिस गेलने आपल्या आक्रमक अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. वेगने धावा काढणं आणि जास्तीत जास्त चौकार आणि षट्कार ठोकणं ही गेलची खासियत. आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक, लीगमध्ये सर्वाधिक षट्कार आणि एका सामन्यात सर्वाधिक धावा यांसारखे अनेक रेकॉर्ड्स क्रिस गेलच्या नावावर आहेत. दरम्यान, वाढत्या वयामुळे गेलच्या अंदाजात किंचित फरक पडला असला तरी तो चेंडू टोलावत चौकार, षट्कार ठोकण्यात कधीच कमी पडत
नाही. त्यामुळे या सीझनमध्येही आपल्याला क्रिस गेलं नावाचं वादळ दुबईतल्या मैदानांवर घोंगावताना दिसू शकतं.


महत्त्वाच्या बातम्या :