WTC Final And IPL Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप विजेत्याला दिली जाणारी बक्षीस रक्कम आयसीसीने जाहीर केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप जिंकणाऱ्यांना 13 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे. पण ही रक्कम आयपीएल विजेत्यांपेक्षा किरकोळ आहे. आयपीएल विजेत्यांना 20 कोटी रुपयांची रक्कम दिली जाते. म्हणजे, तब्बल सात कोटी जास्त रक्कम मिळते. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप विजेत्याची रक्कम जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडतोय.. आयपीएलपेक्षा ही रक्कम किरकोळ असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलेय. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमध्ये किती रक्कम ? 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप  विजेत्याला 13कोटींहून अधिक बक्षीस म्हणून रक्कम मिळेल. तर उपविजेत्या संघाला 6.65 कोटी रुपये बक्षीस रकमेच्या रूपात दिली जाईल. आयसीसीने अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली आहे.  गतविजेत्या संघापेक्षा यंदा 1.29 कोटी रुपये जास्त मिळणार आहे. यंदा उपविजेत्याला 6.65 कोटी रुपये दिले जाणार आहे. विजेता आणि उपविजेत्याशिवाय दक्षिण आफ्रिका 3.5 कोटी, इंग्लंड 2.8 कोटी,  श्रीलंका 1.6 कोटी रुपये दिले जाणार आहेत.  न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि बांग्लादेश या संघांना प्रत्येकी 82 - 82 लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2021-23 च्या हंगामातील संघाच्या कामगिरीनुसार, रक्कम दिली जातेय. 


आयपीएल विजेत्यांना किती रक्कम मिळणार ?


आयपीएलच्या सोळाव्या हंगाम अखेरच्या टप्प्यात आलाय. मुंबई आणि गुजरात यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना रंगणार आहे, यातील विजेता संघ चेन्नईसोबत दोन हात करणार आहे. विजेत्याला संघाला 20 कोटी रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये दिले जातात. तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघाला 7 कोटी रुपये दिले जातात.. तर चौथ्या स्थानावर असणाऱ्या संघाला 6.5 कोटींचे बक्षीस दिले जाते.  ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातात. तसेच, सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. सॅम करनला पंजाबने आयपीएल 2023च्या लिलावात तब्बल 18.50 कोटी रुपयांना ताफ्यात सामील केले होते. त्यामुळे बक्षीस रकमेतील तफावत खूपच मोठी असल्याचे दिसते. सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे.