Akash Madhwal on Roll, IPL 2023 Qualifier 2 : आज आयपीएल 2023 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. गुजरात आणि मुंबईसाठी आजचा सामना 'करा किंवा मरो' असा आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. पाच वेळ चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि गतविजेत्या गुजरात टायटन्सचे लक्ष्य हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याकडे असेल.
मुंबईचा 'रायझिंग स्टार' आकाश मधवाल गुजरातसाठी डोकेदुखी
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघ विक्रमी सहाव्या वेळेस आयपीएलचं विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्ससह मुंबई इंडियन्सचीही अंतिम फेरी गाठण्याची इच्छा प्रबळ असून त्यासाठी दोन्ही संघ सर्वतोपरी प्रयत्न करतील. या सामन्यात मुंबईचा गोलंदाज आकाश मधवाल गुजरातसाठी मोठं आव्हान ठरू शकतो.
गेल्या सामन्यात आकाशने घेतल्या पाच विकेट
इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या 16 व्या मोसमात एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 81 धावांनी पराभव करत नॉकआउट केलं. या विजयासह मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पोहोचला आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात आकाश मधवाल मुंबई इंडियन्सच्या विजयाचा खरा हिरो ठरला. आकाश मधवाल 5 धावांत 5 बळी घेतले. मधवाल या दमदार कामगिरीमुळे तो 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. त्यामुळे आजच्या सामन्यात तो गुजरात संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.
मुंबईचा संकटमोचक आकाश मधवाल
मागील दोन सामन्यात आकाश मधवाल मुंबईसाठी संकटमोचक ठरला आहे. दोन सामन्यात मधवाल याने 9 विकेट घेतल्या आहेत. जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत आकाशने भेदक मारा केलाय. आकाश मधवाल याचे नाव सध्या देशभरात चर्चेत आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास कठीण होता. आकाश मधवाल याने 24 व्या वर्षी लेदर बॉलर प्रक्टिस सुरु केली. त्याआधी तो टेनिस क्रिकेटने खेळत होता.
पदार्पणाच्या हंगामात संघासाठी महत्त्वाची कामगिरी
आकाश मधवालनं यंदाच्या हंगामात आयपीएल 2023 मध्ये पदार्पण केलं. यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूने मुंबई इंडियन्सला क्वालिफायर सारखा महत्त्वाचा सामना जिंकून दिला. मुंबई इंडियन्ससाठी खरा हिरा ठरलेल्या या खेळाडूला संघाने फक्त काही लाख रुपयांना संघात सामील केलं. पण, या खेळाडूनं लाखमोलाची कामगिरी केली आहे.
आकाश मधवालसाठी मुंबईने मोजले फक्त काही लाख
मुंबई इंडियन्सच्या एलिमिनेटर विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 29 वर्षीय आकाश मधवालने आपल्या संघासाठी जे काम केले ते करोडो रुपये मोजणारे खेळाडूही करू शकले नाहीत. मुंबई इंडियन्सच्या टीमने आकाश मधवालला 20 लाख रुपयांच्या किमतीला आपल्या टीममध्ये सामील केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एका मोसमात मधवालला मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि आज त्याने कर्णधार रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला. सूर्यकुमार यादवच्या जागी 2022 मध्ये मधवालचा मुंबई संघात समावेश झाला असता. पण आयपीएल 2022 मध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
आरसीबीचा नेट बॉलर होता आकाश मधवाल
आकाश मधवाल हा उत्तराखंडच्या पांढऱ्या चेंडू संघाचा कर्णधार आहे. 2020 मध्ये मधवाल नेट बॉलर म्हणून आरसीबी संघाला भाग होता. 2021 मध्ये तो लिलावात अनसोल्ड राहिला. आरसीबी (RCB) च्या आकाशची प्रतिभा न ओळखल्याने मुंबई इंडियन्स संघाने 2022 मध्ये त्याला संघात सामील केलं. मधवाल यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराहची जागा उत्तमरित्या सांभाळताना दिसत आहे.