IPL 2022: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली आयपीएल 2022 मध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करत आहेत. यंदाच्या हंगामात रोहित शर्मानं 8 सामन्यात 153 धावा केल्या आहेत. दुसरीकडं विराट कोहलीलाही यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. विराट 9 सामन्यांमध्ये केवळ 129 धावा करू शकला आहे.


आयपीएलच्या इतिहासात एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणारा विराट कोहली यंदाच्या हंगामात दोनदा शून्यावर बाद झाला आहे. सध्याच्या काळातील दिग्गज फलंदाजामध्ये आत्मविश्वासाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक माजी दिग्गजांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला आयपीएलमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.परंतु, भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं दोघांनाही पाठिंबा दर्शवला आहे. तसेच हे दोघेही लवकरच कमबॅक करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. 


सौरव गांगुली म्हणाले की, "विराट- रोहित दोघेही महान खेळाडू आहेत. हे दोघेही लवकरच फॉर्ममध्ये येतील. मला माहिती नाही विराट कोहलीच्या डोक्यात काय चाललंय. पण तो कमबॅक करेल, तो महान खेळाडू आहे". विराट कोहलीच्या खराब फॉर्मचा परिणाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्रदर्शनावर होणार आहे. बंगळुरूनं आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात बंगळुरूला विजय मिळवता आलाय. तर, चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. 


रोहित शर्माचा खराब फॉर्म मुंबईच्या संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यंदाच्या हंगामात रोहित शर्मानं एकही अर्धशतक मारलं नाही. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाशी आहे म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. मुंबईचा अजूनही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. 


हे देखील वाचा-