अहमदनगर : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election ) आणि आयपीएलचं 17 वं (IPL 2024) पर्व दोन्ही गोष्टी एकाचवेळी सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान पार पडलंय. चौथ्या टप्प्याचं मतदान 13 मे रोजी होणार आहे. या टप्प्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके (Nilesh Lanke) आणि भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे रिंगणात आहेत. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे सभा पार  पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित होते.यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक प्रचारात आयपीएलचा दाखला देत गुजरात कनेक्शन जोडलं. 


बाळासाहेब थोरात काय म्हणाले?


निलेश लंके यांच्या प्रचाराच्या सभा पाहिलेल्या आहेत. निलेश लंकेंच्या सभेतील कार्यकर्त्यांचा करंट 3000 चा व्होल्ट असतो. तीन हजार व्होल्टचा करंट असेल तर शॉक कसा असणार, जाळ होणार जाळ असं बाळासाहेब तोरात म्हणाले. आपला मोठा विजय होणार असून चक्रीवादळ निर्माण झालंय. निवडणूक यशस्वीरितीनं पुढं नेताय. तुम्हाला अजून काळजी घ्यावी लागेल. शेवटचं मत पडेपर्यंत काळजी घ्यावी लागेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 


निलेश लंके यांनी आमदार म्हणून मतदारसंघात अहोरात्र काम केलं. निलेश लंके यांनी करोना काळात चांगलं काम केलंय. पंतप्रधानांच्या सर्व सभा फेल आहेत, ते काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. 


कांद्याची बाजारपेठ ठप्प आहे. कांद्याची निर्यातबंदी उठवली असं सांगितलं गेलं. पण, एकाच ठिकाणाहून कांद्याची निर्यात होतेय, ते म्हणजे गुजरात होय, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 
 
फक्त गुजरातसाठी निर्णय घेतले जातात. मला तर आणखी एक गोष्ट कळाली की एवढंच काय तर आयपीएल सुरू आहे, तिथे मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) व्हायला हवा तर तिथं हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कॅप्टन झाला. तिथे क्रिकेटवाले लोक नाराज झाले कारण तो गुजरातचा आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राजकारण ठीक आहे. पण खेळातही गुजरात पाहायला लागलात तर, तुम्हाला गुजरातलाच जावं लागेल, असं थोरात म्हणाले.  


संबंधित बातम्या :


बारामतीचं मतदान 5 टक्क्यांनी घटलं, हुकुमी खडकवासाल्याने टेन्शन वाढवलं, सुप्रिया की सुनेत्रा, आकडेवारी कुणाच्या बाजूने?


काँग्रेसचा मोठा निर्णय, लोकसभेला पहिल्यांदा 400 पेक्षा कमी उमेदवार, मित्र पक्षांना 101 जागांची लॉटरी