मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) एकूण 56.97 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झाली आहे. 2019 मध्ये बारामतीत 61.70 टक्के मतदान झाले होते. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. त्यामुळे मतदानातील ही साधारण 5 टक्क्यांची घटही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.


बारामती लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामधील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याने या भागातून सुनेत्रा पवार यांना मोठी लीड मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, खडकवासला मतदारसंघात अवघे 50 टक्के मतदान झाले आहे. ही महायुतीच्यादृष्टीने चिंताजनक बाब मानली जात आहे. याशिवाय, सुरुवातीच्या काळात अजित पवार यांना कडवा प्रतिकार करणाऱ्या विजय शिवतारे यांच्या पुरंदरमध्ये अवघे 41.1 टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत भाजपच्या निवडणुकीच्या काळातील व्यवस्थापनाचा अनुभव लक्षात घेता मतदानाच्या दिवशी भाजपकडून आपले जास्तीत जास्त मतदार कशाप्रकारे घराबाहेर पडतील, यावर भर दिला जातो. मात्र, पुरंदर आणि खडकवासल्यात मतदार पूर्णपणे निरुत्साही असल्याचे दिसून आले. 


बारामतीची भूमी ही लढाईचे केंद्र असल्याने या विधानसभा मतदारसंघात साहजिक सर्वाधिक 64.50 टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल इंदापूरमध्ये 62.50 टक्के आणि भोरमध्ये 48.34 टक्के मतदान झाले आहे. हे दोन्ही भाग मतदानाच्या दिवशी चांगलेच चर्चेत होते. मतदानाच्या आदल्या रात्री भोरच्या वेल्हे परिसरात अजितदादा गटाकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. तर इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली होती. त्यामुळे दिवसभर इंदापूर आणि भोर हे भाग चर्चेत होते. इंदापूरमध्ये अजितदादा गटाच्या दत्तात्रय भरणे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. याशिवाय, त्यांना भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांची साथ होती. त्यामुळे इंदापुरात मतदानाची टक्केवारी चांगली राहिली आहे. ही अजित पवारांच्यादृष्टीने सकारात्मक गोष्टी म्हणावी लागेल. 


बारामतीमधील मतदानाची प्रमुख वैशिष्ट्य  


बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला हा सर्वाधिक मोठा मतदारसंघ आहे. याठिकाणी मतदारांची संख्याही सर्वाधिक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या भाजपच्या कांचन कुल यांना खडकवासल्यातून 70 हजारांची आघाडी मिळाली होती. मात्र, यंदा खडकवासल्यात अवघे 50 टक्के मतदान झाले आहे. ही बाब अजित पवार आणि महायुतीचं टेन्शन वाढवणारी आहे. खडकवासल्यात भाजप आणि अजितदादांचा पाठिराखा वर्ग असल्याने या भागातून जास्तीत जास्त मतदान होणे आवश्यक होते. 


भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. त्यामुळे या भागातून सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळण्याची आशा आहे. 2019 च्या तुलनेत भोरमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. ही गोष्ट सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर  पडणार का, हे आता पाहावे लागेल. तर भाजपचे राहुल कुल आमदार असलेल्या दौंडमध्ये मतदानाचा टक्का कमी झाला आहे. याचाही सुप्रिया सुळे यांना फायदा होऊ शकतो. तर पुरंदर मतदारसंघातही मतदानाची टक्केवारी कमी असली तरी ती 2019 च्या तुलनेत फारशी बदललेली नाही. मात्र, पुरंदरमध्ये जितके मतदान झालेले आहे ते पूर्णपणे सुनेत्रा पवारांच्या बाजूने वळाले आहे का, ही गोष्ट आगामी काळात स्पष्ट होईल. 


आणखी वाचा


Lok Sabha Election 2024 : शरद पवार, सुप्रिया सुळे आणि बारामती...!