मुंबई : धनत्रयोदशी ते भाऊबीज यादरम्यान पाच दिवसांसाठी कोरोनाशी संबंधित नियमावलीचं काटेकोरपणे पालन करत मुंबईतील फक्त दोन जैन मंदिरं खुली करून भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. मात्र हे निर्देश सरसकट लागू करत इतर 100 जैन मंदिरं खुली करण्याची मागणी फेटाळून लावत त्यांना स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टानं यावेळी दिले. त्यामुळे 13 ते 17 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 6 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत दादर आणि भायखळा येथील दोन मुख्य मंदिरं भाविकांना प्रार्थनेसाठी खुली राहतील.


जैन धर्मासाठी दिवाळीतील पाच दिवसांचा कालावधी हा शुभ आणि महत्वाचा मानला जातो. त्यामुळे या पाच दिवासांसाठी जैन मंदिरं खुली कऱण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत हायकोर्टात 'श्री आत्म कला लब्दी सुरीश्वरजी ग्यान जैन मंदिर' आणि 'शेठ मोतीशा धार्मिक धार्मादाय संस्था' दोन जैन मंदिरांच्या विश्वस्तांनी हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुट्टीकालीन न्यायालयात न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्यासमोर सुनावणी पार पडली. याआधीही जैन समुदायाला कोविड-19च्या काळात टाळेबंदी दरम्यानची नियमावली, सामाजिक अंतर आणि इतर अटी-शर्तींसह तीन मंदिरे खुली करण्याची परवानगी देण्यात आली होती, असा युक्तिवाद शहा यांनी यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने केला. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही दाखले देत 102 जैन मंदिरे खुली करण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी, अशी विनंती खंडपीठाकडे केली.


त्यावर दिवाळी हा फक्त जैन बांधवांचा सण नसून समस्त हिंदूंसाठी महत्वाचा आणि मोठा सण आहे. त्यामुळे दिवाळीचे पाच दिवस जैन समुदायासाठीच फक्त महत्वाचे आहेत, असा याचिकाकर्त्यांचा दावा निराधार असल्याचा खुलासा राज्याच्यावतीने बाजू मांडताना महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला. तसेच ही याचिका जनहित याचिका नसल्यामुळे दोन्ही याचिकाकर्त्यांच्यांवतीने संपूर्ण जैन समाजाला दिलासा मिळू शकत नाही, असे स्पष्ट करत कुंभकोणी यांनी सरसकट सर्व जैन मंदिरं खुली करण्याच्या मागणीला विरोध केला. तसेच हिंदू, ख्रिश्चन आणि मुसलमान या सर्वच धर्मातील भाविक, श्रद्धाळू, त्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यास उत्सुक आहेत. मात्र, राज्य सरकारला कोरोना परिस्थितीचे भान आणि जाण आहे. दिवाळीनंतर मंदिरे, प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत विचारविनिमय सुरू असून सद्य परिस्थितीत सरकारने संयमी भूमिका घेतली आहे. त्यामुळे जैन समुदायानेही संयम राखवा, असेही कुंभकोणी यांना स्पष्ट केले. त्यांची बाजू ग्राह्य धरत हायकोर्टानं 102 पैकी फक्त याचिकाकर्त्या विश्वस्तांना दिलासा देत त्यांची दोन मंदिरं धनत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसांसाठी कडक नियमावलीसह खुली करून भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी खंडपीठाने दिली.


मंदिरांची बारशी तुलना चुकीची : राज्य सरकार


राज्यात एकीकडे बार, रेस्टॉरंट्स आणि थिएटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असतानाही मंदिरे खुली करण्याबाबत परवानगी देण्यास भेदभाव का केला जात आहे?, असा सवाल याचिकाकर्त्यांच्यावतीने उपस्थित करण्यात आला. त्यावर याचिकाकर्त्यांनी बारची मंदिरांशी केलेल्या तुलनेवर कुंभकोणी यांनी आश्चर्य व्यक्त केले. केवळ आर्थिक कारणास्तव तसेच व्यावसायिकतेच्यादृष्टीने बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याच्याशी याचिकाकर्त्यांनी अशी तुलना करणे चुकीचे आहे असा युक्तिवाद राज्य सरकारच्यावतीनं महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांनी केला.