धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का! दुखापतीमुळे ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधून माघार
महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का बसला आहे. दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधून माघार घेतली आहे.
IPL 2020 : तीन वेळा आयपीएलचं विजेतेपद आणि पाच वेळा उपविजेता ठरलेली धोनीची चेन्नई सुपर किंग्ज यंदाच्या मोसमात मात्र अडचणीत सापडली आहे. आणि चेन्नईच्या अडचणींचा हा डोंगर संपता संपत नाही आहे. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे चेन्नईच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होच्या मांडीचा सांधा दुखावला होता. त्यामुळे मोक्याच्या क्षणी ब्राव्होला गोलंदाजी करता न आल्यानं चेन्नईला हा सामना गमवावा लागला. दरम्यान चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी ब्राव्होच्या माघार घेण्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ब्राव्हो उद्याच मायदेशी परतणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्राव्होनं यंदा सहा सामन्यात सहा विकेट्स घेतल्या होत्या.
IPL 2020: दिल्लीवर विजय मिळवत Points Tableमध्ये पंजाबची बढती, Delhi Capitals टॉपवर तर चेन्नई तळाला
चेन्नईच्या मागे संकटाचा फेरा
खेळाडूंची माघार, दुखापती, कोरोनामुळे संघाला सरावाला मिळालेला कमी वेळ या कारणांमुळे यंदा चेन्नईची पिछेहाट झाली. स्पर्धा सुरु होण्याआधीच अनुभवी खेळाडू सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे दुबईतून पुन्हा मायदेशी परतला त्यानंतर हरभजन सिंगनही स्पर्धेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
हे थोडं की काय म्हणून क्वारंटाईन कालावधी संपता संपताच चेन्नईच्या दोन खेळाडूंसह एकूण 12 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे खेळाडूंच्या क्वारंटाईन कालावधीत आणखी वाढ करण्यात आली. त्यामुळे संघाला सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. स्पर्धा सुरु झाल्यानंतर अंबाती रायुडूला झालेल्या दुखापतीचाही चेन्नईला मोठा फटका बसला.
चेन्नईची पहिल्यांदाच साखळी फेरीआधी एक्झिट?
2008 पासून चेन्नईनं गेल्या 10 मोसमात प्रत्येकवेळी स्पर्धेची बाद फेरी गाठली होती. त्यात या संघानं आठवेळा फायनल खेळून तीनवेळा विजेतेपदही पटकावलंय. पण यंदा मात्र चेन्नई साखळी फेरीतूनच बाहेर जाण्याची चिन्ह आहेत. कारण आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांपैकी केवळ तीन सामनेच चेन्नईला जिंकता आले आहेत. त्यामुळे उरलेल्या चारही सामन्यात चेन्नईनं मोठ्या फरकानं विजय मिळवल्यास टॉप फोरमध्ये स्थान मिळवण्याची पुसटशी संधी राहील.