कोलंबो : '2011 चा एकदिवसीय विश्वचषक जो भारताने जिंकला होता, तो फिक्स होता', असा आरोप श्रीलंकेच्या एका मंत्र्याने केला आहे. मात्र श्रीलंकेच्याच माजी कर्णधाराने या दाव्याचं खंडण केलं असून ह्या खोट्या आरोपाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. मंत्री महिंदानंद अलुथगामगे यांनी 2011 विश्वचषक फायनल फिक्स होती, असा आरोप केला आहे. त्यावर श्रीलंकेचा माजी कर्णधार अरविंदा डी सिल्वाने आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीकडे या 'खोट्या' दाव्याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
एका स्थानिक टिव्ही चॅनेलला मुलाखत देताना 2011 साली श्रीलंकेचे क्रीडा मंत्री असलेले अलुथगामगे यांनी म्हटलं आहे की, भारत आणि श्रीलंकामधील 2011 विश्वचषक फायनल फिक्स होता. आज मी तुम्हाला सांगतो की, आपण 2011 चा विश्वचषक विकला होता, मी क्रीडामंत्री असतानाही हे बोललो होतो, असा दावा त्यांनी केला आहे.
यावर अरविंदा डी सिल्वा जे त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते त्यांनी म्हटलं आहे की, आपण लोकांना असत्यापासून प्रत्येकवेळी दूर करु शकत नाही. आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीने याची चौकशी करावी. त्यांनी म्हटलं आहे की, जसं आपण आपल्या विश्वचषक विजयाला साजरं केलं तसंच सचिन तेंडूलकर सारखा खेळाडू आपल्या जीवनातील या सुंदर आठवणींना साजरं करतो. मला वाटतं सचिन आणि भारताच्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी भारत सरकार आणि क्रिकेट बोर्डाचं हे कर्तव्य आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी.
याप्रकारचे गंभीर आरोप अनेक गोष्टींवर परिणाम करतात. अशावेळी निवडकर्ते, खेळाडू, टीम व्यवस्थापन यावर परिणाम होतो. त्यामुळं हे स्पष्ट होणं गरजेचं आहे, हे खेळासाठी चांगलं राहील, असं अरविंदा डी सिल्वाने म्हटलं आहे.
याआधी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा महेला जयवर्धनेयांनी देखील अलुथगामगे यांच्या दाव्याचं खंडण केलं होतं.
2011 वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धनेच्या शानदार शतकानं 275 धावांचं लक्ष्य टीम इंडियाला मिळालं होतं. जे गौतम गंभीर (97) आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (91) जबरदस्त खेळीनं पार केलं होतं. 1983 नंतर दुसऱ्यांना टीम इंडियानं एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
'2011 ची वर्ल्डकप फायनल फिक्स!', श्रीलंकन मंत्र्याचा आरोप, माजी कर्णधाराने केली चौकशीची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2020 10:54 AM (IST)
मंत्री महिंदानंद अलुथगामगे यांनी 2011 विश्वचषक फायनल फिक्स होती, असा आरोप केला आहे. त्यावर श्रीलंकेचा माजी कर्णधार अरविंदा डी सिल्वाने आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीकडे या 'खोट्या' दाव्याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -