KL Rahul : एकदिवसीय विश्वचषक (World Cup) संपल्यानंतर जगभरातील सर्व क्रिकेट संघांसोबत भारतीय क्रिकेट संघानेही (Team India) आपला नवा प्रवास सुरू केला आहे. या नव्या प्रवासात टीम इंडियाचा पहिला मुक्काम आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धची देशांतर्गत टी-20 मालिका, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानंतर टीम इंडिया दुसरा टप्पा पार करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जाईल, जिथे टी-20, एकदिवसीय आणि कसोटी या तिन्ही मालिका खेळल्या जातील.
भारताच्या T-20 संघाचे काय होणार?
दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे, त्यामुळे पहिली चिंता या मालिकेची आहे आणि सर्वात मोठी चिंता ही आहे की टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार कोण? टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची स्थिती पाहता प्रत्येक मालिकेत नवा कर्णधार पाहायला मिळेल, अशीच चिन्हे आहेत. रोहित शर्माकडे (Rohit Sharma) तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद दिल्यानंतर बीसीसीआयने टी-20 मध्ये अनेक कर्णधारांचा वापर केला आहे आणि हार्दिक पांड्याचा सर्वाधिक वापर केला आहे.
नवीन प्रोमो व्हिडिओने राहुलच्या नावाची चर्चा रंगली
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी ब्रॉडकास्टर्सने तयार केलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) दिसत होता, जो दक्षिण आफ्रिकेत जाऊन टी-20 मालिका खेळून जिंकण्याविषयी बोलत होता. मात्र, आता हार्दिक पांड्याला दुखापत झाली असून, अहवालानुसार तो दक्षिण आफ्रिका मालिकेपर्यंतही बरा होऊ शकणार नाही. याच कारणामुळे ऑस्ट्रेलिया मालिकेत सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले होते आणि आता दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी एक नवीन प्रोमो व्हिडिओ आला आहे, ज्यामध्ये केएल राहुल दिसत आहे.
नवीन प्रोमोमध्ये हार्दिकच्या जागी केएल राहुल
या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्याऐवजी केएल राहुल दक्षिण आफ्रिकेत जाऊन टी-20 मालिका खेळून जिंकण्याबाबत बोलत आहे. केएल राहुलचा प्रोमो पाहून एक गोष्ट निश्चित झाली आहे की किमान केएल राहुल दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी-20 मालिकेतील संघाचा भाग असेल. मात्र, प्रोमोमध्ये त्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी केएल राहुल कर्णधार म्हणून पुनरागमन करत असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. काही लोक त्याला कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणत आहेत.
हार्दिक पांड्या परतला मुंबईत
दुसरीकडे, गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतण्यावर औपचारिकरित्या शिक्कामोर्तब झालं आहे. मुंबई इंडियन्सकडून आणि आयपीएलकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आल्याने चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. हार्दिकला मुंबईत परतल्याचा आनंद असला, तरी बुमराह नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. इतकंच नव्हे, तर या घडामोडींमध्ये कॅप्टन रोहितला सुद्धा काहीच माहिती नव्हती, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आयपीएलकडे लक्ष देताना टीम इंडियाची कॅप्टनसी दूर गेली ना? अशीही चर्चा आहे.
केएल राहुलची दमदार कामगिरी
दुसरीकडे, केएल राहुलने दुखापतीनंतर आशिया कप 2023 मध्ये पुनरागमन करत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. विश्वचषक स्पर्धेत हाच फॉर्म सुरू ठेवला आणि टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून दिला. यानंतर राहुलने नेदरलँडविरुद्ध शतक झळकावले. विश्वचषकातील 11 सामन्यांत त्याने 452 धावा केल्या. एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय यष्टीरक्षक ठरला.
विकेटकीपर म्हणून सर्वोत्तम कामगिरी
राहुलने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत यष्टीरक्षणाची जबाबदारीही घेतली होती. या कालावधीत त्याने 17 विकेटमध्ये योगदान दिले. एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक बाद करणारा तो भारतीय यष्टिरक्षक बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नावावर होता. 2003 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत द्रविडने 16 वेळा बाद केले होते. तर महेंद्रसिंह धोनीने 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात 15 वेळा बाद केले होते. अशा परिस्थितीत केएल राहुलने आता एक अशी कामगिरी केली आहे जी धोनीलाही करता आली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या