KL Rahul : वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागला. सलग 10 सामने जिंकून भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र फायनलमध्ये खराब खेळामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे विश्वचषकातील हा दुसरा अंतिम सामना होता. यापूर्वी 2003 मध्येही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. 


केएल राहुल म्हणतोय, अजूनही काळीज तुटतंय!


अंतिम सामन्यात भारताचा यष्टीरक्षक केएल राहुलने शानदार कामगिरी केली होती. मात्र, वर्ल्डकपच्या फायनलनंतर चार दिवसांनी केएल राहुलनं ट्विट करत भावनांना वाट करून दिली आहे. त्याने ट्विट करून फक्त still hurts... 💔 इतका उल्लेख तीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोन राहुलसह टीम इंडिया हताश दिसून येत आहे, तर एका फोटोत संपूर्ण सं आहे. राहुलच्या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. 






राहुलची दमदार कामगिरी  


केएल राहुलने दुखापतीनंतर आशिया कप 2023 मध्ये पुनरागमन केले आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. यानंतर, त्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हाच फॉर्म सुरू ठेवला आणि टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून दिला. यानंतर राहुलने नेदरलँडविरुद्ध शतक झळकावले. विश्वचषकातील 11 सामन्यांत त्याने 452 धावा केल्या. एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय यष्टीरक्षक बनला आहे.






विकेटकीपिंगमध्ये कमाल 


केएल राहुलने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत यष्टीरक्षणाची जबाबदारीही घेतली होती. या कालावधीत त्याने 17 विकेटमध्ये योगदान दिले. एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक बाद करणारा तो भारतीय यष्टिरक्षक बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नावावर होता. 2003 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत द्रविडने 16 वेळा बाद केले होते. तर महेंद्रसिंग धोनीने 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात 15 वेळा बाद केले होते. अशा परिस्थितीत केएल राहुलने आता एक अशी कामगिरी केली आहे जी धोनीलाही करता आली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या