Virat Kohli and Rohit Sharma : नुकत्याच झालेल्या 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. टीम इंडियाने स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली, पण फायनलमधील पराभव टीम इंडियासह कोट्यवधी चाहत्यांच्या मनाला लागला. स्पर्धा संपताच सर्वाधिक चर्चा टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि किंग विराट कोहलीची सुरु आहे. टीम इंडिया डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्यापूर्वी किंग कोहलीनं मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतीय स्टार फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोहली वनडेमध्ये विश्रांती घेईल आणि फक्त कसोटी क्रिकेटसाठी उपलब्ध असेल.






कसोटी क्रिकेटमध्ये निवडीसाठी उपलब्ध असेल


'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, विराट कोहलीने बीसीसीआयला वनडे क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारे तो केवळ कसोटी क्रिकेटमध्ये निवडीसाठी उपलब्ध असेल. भारतीय संघाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका दौरा असेल, जिथे टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळेल. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. 17 डिसेंबरपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल आणि त्यानंतर 26 डिसेंबरपासून टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.






इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एका सूत्राने सांगितले की, “कोहलीने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना सांगितले आहे की त्याला वनडे क्रिकेटमधून विश्रांतीची गरज आहे आणि जेव्हा खेळावं लागेल तेव्हा तो परत येईल. सध्या त्याने बीसीसीआयला सांगितले आहे की तो कसोटी क्रिकेट खेळणार आहे, म्हणजेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपस्थित राहणार आहे.


रोहितबाबत स्पष्टता नाही


दुसरीकडे, फायनलमधील पराभवापूर्वी भारतीय संघाचे नेतृत्व करून  सलग 10 सामने जिंकणारा कॅप्टन हिटमॅन रोहित वनडे संघ निवडीसाठी उपलब्ध असेल की नाही? याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. रोहितही विश्वचषकानंतर ब्रेकवर युनायटेड किंग्डममध्ये आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह लवकरच रोहित आणि निवड समितीचे अध्यक्ष आगरकर यांच्याशी बोलून भविष्यातील रोडमॅपवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.






कोहली वर्ल्डकपचा मानकरी 


भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, विराट कोहलीने अनेक विक्रम मोडले आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 11 सामन्यांमध्ये 11 डावात 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली. 765 धावांसह कोहलीने एकदिवसीय विश्वचषकाच्या कोणत्याही एका आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता.


इतर महत्वाच्या बातम्या