Mohammed Shami : पहिल्या चार सामन्यात कट्ट्यावर बसावं लागल्यानंतर संघात परतलेल्या मोहम्मद शमीचा रुद्रावतार कायम आहे. मोहम्मद शमीने आतापर्यंत प्रत्येक विरोधी संघाला गारद करून टाकलं आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वांत कमी सामन्यात शमीने बळींचे अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने अवघ्या 17 सामन्यात 50 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे भीम पराक्रम आपल्या नावे करून टाकला आहे.  






आजही न्यूझीलंडविरुद्ध त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत टीम इंडियाला यश मिळवून दिले. त्यानंतर रचिनला सुद्धा त्याने अप्रतिम चेंडूवर गारद केले. त्यामुळे सुरुवातीला दोन धक्के बसल्यानंतर मिशेल आणि कॅप्टन विल्यमसनने नांगर टाकून 179 धावांची भागीदारी केली. खुद्द शमीच्या हातून विल्यमसनचा झेल सुटल्याने वानखेडे मैदानात सन्नाटा पसरला. मात्र, त्यानंतर शमीच पुन्हा टीम इंडियासाठी धावून आला. त्याने 33व्या षटकात विल्यम्सन आणि टॉम लॅथमला बाद करत टीम इंडियाची वापसी केली. त्यानंतर न्यूझीलंडचा धावांचा वेग रोखला गेला.






तत्पूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या फलंदाजीच्या सामन्यात धुमाकूळ घातला आणि एकूण 397 धावा ठोकल्या. त्यानंतर 398 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद शमीने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने डावातील सहावे षटक मोहम्मद शमीकडे सोपवले आणि या वेगवान गोलंदाजाने आपल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर किवी सलामीवीर डेव्हन कॉनवेला बाद केले. कॉनवे 15 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 13 धावा करून परतला. शमीच्या या विकेटमध्ये केएल राहुलने विकेटकीपिंगवर अप्रतिम झेल घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. 






न्यूझीलंडला पहिला धक्का देत शमीने प्रतिस्पर्धी संघाच्या टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडले. त्यानंतर शमीनेच मध्ये भारताला दुसरे यश मिळवून दिले. स्टार रचिन रवींद्रच्या रूपाने न्यूझीलंडला दुसरा धक्का बसला. शमीने विकेटकीपिंग झेलद्वारे भारताच्या झोळीत पुन्हा एकदा विकेट टाकली. यावेळीही शमी आणि केएल राहुलने उत्तम संयोजन दाखवले. डावाच्या 8व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शमीने दुसरी विकेट घेतली. 


कोहली आणि अय्यर शतकवीर ठरले


भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार शतकी खेळी खेळली. कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावले. कोहलीने 113 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरने 70 चेंडूत 150 च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्या. अय्यरने या खेळीत 4 चौकार आणि 8 शानदार षटकार मारले.


इतर महत्वाच्या बातम्या