मुंबई : महायुतीत गळचेपी होत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिल्लीत जाऊन अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या विसर्जनानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी ही भेट झाली असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. तसेच डिसेंबर महिन्यात महायुतीमध्ये मोठा स्फोट होणार असल्याचे देखील विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान याबाबत बोलतांना विनायक राऊत म्हणाले की, "अजित पवार यांना देखील आता पश्चाताप होत आहे. त्यामुळे या पश्चातापातून कसं मुक्त व्हायचं, यासाठी ते विचार करत आहे. अजित दादा तसं स्पष्ट वक्ते आहे. त्यांच्या कार्यक्षमतेला खरं वाव देण्याचं काम मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र आता तशी परिस्थिती नाही. प्रत्येक विधानावरून आता अजित पवारांची गळचेपी होत आहे. मागच्या आठवड्यात अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. तसेच शिंदे यांच्या विसर्जनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी मागणी देखील अजित पवार यांनी केली असल्याचं,” विनायक राऊत म्हणाले.
31 डिसेंबरच्या आसपास महायुतीत मोठा स्फोट
तसेच पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले की, "तीन तिघाडा काम बिघाडा अशी आपल्याकडे म्हण आहे. फक्त ईडीच्या कारवाईच्या दबावामुळे शिंदे गट आणि अजित दादा गट हे दोन घटक सत्तेत सहभागी झाले आहे. हे दोघेही मनापासून तिथे मिसळलेले नाहीत. भारतीय जनता पक्षाची हाव खूप मोठी आहे. त्यामुळे आपलंच घोडं रेटण्याचं काम भाजप करेल. ज्यामुळे 31 डिसेंबरच्या आसपास महायुतीत मोठा स्फोट होणार असल्याचं,” राऊत म्हणाले.
गद्दार गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होतील...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आपात्रेचा निर्णय बहुमतावर घेता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जे काही मार्गदर्शक तत्व दिले आहे, आणि अपात्रबाबत जो काही कायदा आहे त्यानुसारच राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्व आणि सध्याचे प्रचलित नियमांना धरून निकाल दिल्यास गद्दार गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र होतील, असेही विनायक राऊत म्हणाले.
अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी राखीव
अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर निवडून येतील अशी शंभर टक्के खात्री आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ती जागा राखीव ठेवण्यास हरकत नाही असा विचार असल्याच खासदार विनायकराव यांनी म्हटलेलं आहे. जागावाटप मिरीटवर झाल्याचं पाहिजे, त्यामध्ये कोणतेही दुमत असू शकत नाही असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे. ज्या जागा ज्या पक्षाच्या निवडून आल्या त्या जागा त्याच पक्षाकडे राहतीलच. मात्र, मिरीटवर एखादा उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असेल तर त्याबाबतीत जागाबदल करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले होते. विशेष म्हणजे हे मत सर्वांनी स्वीकारले असल्याचं राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: