FIH Women's Hockey WC : महिला हॉकी विश्वचषकातील भारत- इंग्लंडमधील समाना अनिर्णित, वंदना कटारियाने केला एकमेव गोल
FIH Women's Hockey WC : विश्वचषक स्पर्धेतील भारत-इंग्लंडमधील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. भारताकडून वंदना कटारिया हिले एकमेव गोल केला.
FIH Women's Hockey WC : महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील भारत-इंग्लंडमधील सामना अनिर्णित राहिला आहे. भारताकडून वंदना कटारिया हिले एकमेव गोल केला. तर इंग्लंडकडून इसाबेल पीटरने एकमेव गोल केला. त्यामुळे ब गटातील हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. नेदरलँड्समधील वॅगनर स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात आजचा सामना खेळण्यात आला.
आजचा समाना जिंकून भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी होती. परंतु, काही किरकोळ चुकांमुळे भारताला ही गमवावी लागली. या सामन्यातून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
भारताचा पुढील सामना आता 5 जुलै रोजी चीनसोबत होणार आहे. त्याच दिवशी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. पॉइंट टेबलबमध्ये ब गटात न्यूझीलंड पहिल्या, चीन दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या आणि भारत चौथ्या स्थानावर आहे. सर्वच संघांना प्रत्येकी एक गुण आहे.
गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडकडून भारताचा पराभव
ऑलिम्पिकमधील सामन्यात इंग्लंडने भारताचा 4-3 असा पराभव करून भारताला ऐतिहासिक पदकापासून दूर ठेवले होते. विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघाचा उत्साह उंचावला आहे. संघाने प्रथमच FIH प्रो लीगमध्ये तिसरे स्थान पटकावले.
दोन वेळा संधी हुकली
56 व्या मिनिटाला भारताला आघाडी घेण्याची संधी होती. पण शर्मिला देवी जवळून देखील गोल करू शकली नाही. चेंडू तिच्या पायाला लागला. त्यानंतर दोन मिनिटांनी भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण संघाने पुन्हा एकदा गोल करण्याची संधी गमावली. अखेर सामना अनिर्णित राहिला.
राणी रामपालशिवाय भारतीय संघ मैदानात
विश्वचषकासाठी 16 संघ पात्र ठरले असून चार संघांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. भारतीय संघ ब गटात असून त्यात इंग्लंड, न्यूझीलंड आणि चीनचाही समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या राणी रामपालशिवाय भारतीय संघ आज मैदानात उतरला होता. रामपालच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदारी गोलरक्षक सविता पुनियाकडे देण्यात आली होती.