IND vs ENG 3rd Odi Preview : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना आज पुण्यात खेळला जाईल. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 336 धावांनी मोठी धावसंख्या उभारुन देखील पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला नवीन रणनीती घेऊन मैदानात उतरावे लागेल.


टीम इंडियाला सर्वात मोठी अडचण म्हणजे दोन्ही सामन्यात इंग्लंडची सलामीची जोडी फोडणे लवकर शक्य झालं नाही. याशिवाय कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीमुळे भारताच्या अडचणीही वाढल्या. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्सने फिरकीपटूंवर जोरदार आक्रमण केलं आणि मोठी धावसंख्या उभारली.


मागील सामन्याएवढी रविंद्र जाडेजाची कमतरता भारतीय कर्णधार विराट कोहलीला कधीच जाणवली नसेल. गोलंदाजीत कुलदीपला इंग्लंडच्या खेळाडूंनी आठ षटकार लगावले, भारतीय गोलंदाजांमध्ये हे सर्वाधिक आहेत. दुसर्‍या सामन्यात कुलदीपने 84 आणि पहिल्या सामन्यात 64 धावा दिल्या. त्याच वेळी क्रुणालने सहा षटकांत 12 च्या सरासरीने 72 धावा दिल्या. अशा परिस्थितीत लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी मिळू शकते. चहल सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी कोहलीकडे पर्याय नाही.


विराट कोहलीकडून शतकाची अपेक्षा


फलंदाजी करताना 336 धावसंख्या खराब नव्हती, परंतु फलंदाजीच्या शैलीत बदल आवश्यकता आहे. शेवटच्या 15 षटकांत वेगवान खेळण्याचा भारतीय संघाला आत्मविश्वास आहे.  परंतु वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडने दाखवून दिलं आहे की सुरुवातीपासूनच उपयुक्त खेळपट्टीवर आक्रमण करणे योग्य असते.


कर्णधार कोहलीने दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावले आहे, पण आजच्या त्याने शतक ठोकणे अपेक्षित आहे. कोहलीने ऑगस्ट 2019 मध्ये शेवटचे वनडे शतक झळकावले आहे. हार्दिक फिनिशरच्या भूमिकेत असेल पण नुकत्याच संपलेल्या टी - 20 मालिकेशिवाय त्याने अजून बॉलिंग केलेली नाही. टीम मॅनेजमेंटला याचा विचार करावा लागेल.


वेगवान गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार याच्यासह यॉर्कर टाकणारा टी नटराजनला मैदानात उतरवले जाऊ शकते. तसे, शार्दुल ठाकूर फॉर्ममध्ये आहे, परंतु जर त्याला विश्रांती दिली गेली तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासाठी संधी आहे.


दुसरीकडे इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला आहे. बेन स्टोक्स फॉर्ममध्ये आल्यामुळे इंग्लंडला दिलासा मिळाला आहे. इंग्लंड संघात सॅम बिलिंग्ज शेवटच्या सामन्यात पुनरागमन करू शकतो. दुखापतीमुळे बिलिंग्जला दुसर्‍या वनडे सामन्यातून बाहेर होता. डेव्हिड मलानच्या जागी प्लेईंग 11 मध्ये बिलिंगचा समावेश असण्याची शक्यता आहे.