एक्स्प्लोर
महिला ट्वेन्टी 20 विश्वचषक : सलामीच्या सामन्यात भारत न्यूझीलंडशी भिडणार
वेस्ट इंडिजच्या कॅरेबियन बेटांवर यंदाच्या महिला ट्वेन्टी 20 विश्वचषकाचं आयोजन केलं जात आहे. 9 ते 25 नोव्हेंबरदरम्यान भारतासह दहा संघ या विश्वचषकासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

मुंबई : वेस्ट इंडिजमध्ये आयोजित महिलांच्या ट्वेन्टी 20 विश्वचषकाचं बिगुल आज वाजणार आहे. भारताचा सलामीचा सामना आजच न्यूझीलंडशी होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून यंदाच्या विश्वचषकात मोठी अपेक्षा आहे. भारताच्या महिला संघाला वन डे किंवा ट्वेन्टी 20चा विश्वचषक एकदाही जिंकता आलेला नाही. हरमनप्रीत कौरचा भारतीय महिला संघ यंदा तो इतिहास बदलणार का याची क्रिकेटरसिकांमध्ये उत्सुकता आहे. वेस्ट इंडिजच्या कॅरेबियन बेटांवर यंदाच्या महिला ट्वेन्टी 20 विश्वचषकाचं आयोजन केलं जात आहे. 9 ते 25 नोव्हेंबरदरम्यान भारतासह दहा संघ या विश्वचषकासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. भारतीय महिला संघाचा सध्याचा फॉर्म पाहता हा संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. विश्वचषकाच्या या मोहिमेत कर्णधार हरमनप्रीत कौर, अनुभवी मिताली राज आणि सलामीवीर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल. झुलन गोस्वामीच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा मानसी जोशी, पूजा वस्त्रकार अरुंधती रेड्डी यांच्यावर असेल. तर फिरकीपटू अनुजा पाटील, पूनम यादव आणि एकता बिश्तकडूनही भारताला मोठी अपेक्षा राहिल. 9 नोव्हेंबरपासून महिला टी20 विश्वचषक, पाहा संपूर्ण वेळापत्रक भारतीय महिलांचा टी 20 विश्वचषकातला प्रवास... या विश्वचषकात भारताचा समावेश 'ब' गटात करण्यात आला आहे. 9 नोव्हेंबरला होणाऱ्या सलामीच्या सामन्यात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. 11 नोव्हेंबरला भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. त्यानंतर 15 नोव्हेंबरला आयर्लंडविरुद्ध तर 17 नोव्हेंबरला बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भारतीय संघ दोन हात करेल. ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात भारतीय महिला संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. गेल्या पाच विश्वचषकांत तीन वेळा ऑस्ट्रेलियाने तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा बाजी मारली आहे. त्यामुळे हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ नवा इतिहास घडवणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल.
आणखी वाचा























