Team India World Cup Final : टीम इंडियाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स घेतल्या. फायनलचा महामुकाबला 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पीएम मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. दैनिक जागरणने याबाबत वृत्त दिलं आहे. 






दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध सात विकेट घेत टीम इंडियाची फायनल निश्चित केलेल्या मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करून शमीवर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, आजची उपांत्य फेरी अधिक खास बनली ती चमकदार वैयक्तिक कामगिरीमुळे. मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात राहील. शमी छान खेळला!






यंदाच्या विश्वचषकात शमीने सहा सामन्यांत 23 बळी घेतले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.






सेमीफायनलच्या महामुकाबल्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करत 397 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर गडगडला. भारतीय संघाचा विश्वचषकातील हा सलग 10वा विजय आहे. मोहम्मद शमीने 9.5 षटकांत 57 धावांत 7 बळी घेतले. 


पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताच्या विजयाचे अभिनंदन केले.


विराट कोहलीने सचिनचा विक्रम मोडला


विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतके झळकावली. या सामन्यात कोहलीने आपले 50 वे शतक पूर्ण केले. हे शतक झळकावून कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला. आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.


इतर महत्वाच्या बातम्या