मुंबई : राज्यात मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी (OBC Reservation) आरक्षणाचा वाद सुरु असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना डेंग्यूची लागण झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यानंतर अजित पवार यांची वारंवार बदललेली कृती पाहता त्यांना राजकीय डेंग्यू तर झाला नाही ना या चर्चांनी जोर धरला.  सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर अजित पवारांचं आजारपण खरं की खोटं याची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. पण या चर्चांना कारण देखील तसंच आहे. आजारपणामुळे अजित पवार कुणालाच भेटणार नाहीत, असं प्रसिद्धीपत्रक पवारांच्या कार्यालयाने काढलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार पुण्यात गेले आणि त्यानंतर थेट त्यांनी दिल्ली गाठली. 


मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकरालं आणि राज्यात एकच खळबळ माजू लागली. पण अजित पवार मात्र या सगळ्यात कुठेच दिसेल नाहीत, त्याला कारण होता त्यांचा डेंग्यू. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिली दिली आणि त्यानंतर दावे प्रतिदाव्यांना सुरुवात झाली. दरम्यान अजित पवारांचं आजारपणातून बाहेर येत 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्याला देखील त्यांनी हजेरी लावली. 


आजारपण ते वानखेडेवरील मॅच


26 ऑक्टोबर- मोदींसमवेत शिर्डी येथील कार्यक्रमात सहभाग


27  ऑक्टोबर- दौंड येथे खाजगी कारखान्याला भेट


28  ऑक्टोबर- माळेगाव साखरखान्याला मराठा समाज विरोधानंतर जाणं टाळलं


29 ऑक्टोबर- प्रफुल्ल पटेल यांची ट्विट करत डेंग्युची लागण झाल्याची माहिती


8 नोव्हेंबर- मंत्रीमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असल्याची पवार कार्यालयाची माहिती मात्र प्रत्यक्षात गैरहजर


8 नोव्हेंबर- प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून पुढील काही दिवस कुणालाच भेटणार नसल्याची माहिती


10  नोव्हेंबर- अजित पवार शरद पवार यांची प्रतापराव पवार यांच्या घरी भेट


10 नोव्हेंबर- अजित पवार शरद पवारांच्या भेटीनंतर थेट अमित शाहांच्या भेटीसाठी रवाना


13 नोव्हेंबर- श्रीनिवास पवार यांच्या घरी दुसऱ्यांदा काका-पुतण्या भेट


15  नोव्हेंबर- सुप्रिया सुळे यांची भावबीजेसाठी अजित पवारांच्या निवासस्थानी हजेरी


15 नोव्हेंबर- दुपारनंतर अजित पवार यांची वानखेडे स्टेडियमवर मॅचसाठी हजेरी


जाणीवपूर्वक ड्येंग्यूचं कारण पुढे?


अजित पवारांच्या मागील 10 दिवसांतील या हालचाली पाहता जाणीवपूर्वक अजित पवार यांनी मराठा समाजाचा प्रश्न ऐरणीवर असताना डेंग्यूचं कारण पुढं केल्याची शंका रामदास कदम यांनी व्यक्त केली. त्यामुळे सत्ताधारी गटातील नेत्यांनाच अजित पवार यांच्याबाबत संशय येत असल्याचं समोर आलं. याला आणखी एक बळ देणारं कारण म्हणजे अजित पवार यांच्या आजारपणात ना मुख्यमंत्र्यांनी पवारांची भेट घेतली ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतली. 


दरम्यान अजित पवार यांच्या आजारपणाबाबत शंका उपस्थित होत असताना अजित पवार गटातील एकाही मोठ्या नेत्याने या शंकेला उत्तर दिलं नसल्याचं पाहायला मिळालं. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार भेटी देखील होऊ लागल्या. त्यामुळे आता आपण नेमकी कोणती भूमिका घ्यावी याबाबत बुचकळ्यात पडलेल्यांची संख्या मात्र जास्त आहे.  खरी राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत सध्या निवडणुक आयोगात घमासान सुरुये. अशावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या वारंवार होणाऱ्या भेटी पाहता सध्या सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गट पवार कुटुंबाकडे लक्ष ठेवून आहेत. कारण राजकीय वर्तुळात अजित पवार घरवापसी करणार की शरद पवार अजित पवार गटाला पाठिंबा देणार यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. 


हेही वाचा : 


लेट पण थेट, अखेर अजितदादा 'पवारांच्या' दिवाळीत हजर; शरद पवारांच्या बरोबर मागे फोटोमध्ये 'सेट'!