Mohammed Shami, IND vs NZ Semi-Final : आज प्रत्येक भारतीयांच्या ओठावर मोहम्मद शामीचे नाव आहे. शामीने विश्वचषकात तोफगोळे सोडल्यासारखी गोलंदाजी केली. शामीपुढे प्रतिस्पर्धी फलंदाजांनी गुडघे टेकलेत अवघ्या सहा सामन्यात त्याने 23 फलंदाजांची शिकार केली. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना थेट तंबूचा रस्ता दाखवला अन् जगभरात शामीच्या नावाचा जयजयकार झाला. शामीचा हा ऐतिहासिक स्पेल विश्वचषकात सोनेरी अक्षराने लिहिलाय. शामीने यंदाच्या विश्वचषकात अनेक विक्रमांना गवसणी घातली. पण शामीला इतक्या सहजासहजी यश मिळाले नाही. एक दोन नव्हे तीन वेळा शामीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. संसारही सुखी झाला नाही. आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला पण शामीने हार मानली नाही. शामीने जिद्दीने पुन्हा पुन्हा उभा राहिला अन् जगाला आपली उपयोगिता सिद्ध करुन दाखवली.
2020 मध्ये कोरोना महामारीने जगभरात कहर माजवला होता. त्यावेळी जगभरात सर्व ठप्प झालं होतं. क्रिकेट, मनोरंजन अन् व्यवसायाचे चक्रही थांबले होते. रोहित शर्माने इन्स्टाग्राम लाईव्हवर अनेक खेळाडूंसोबत चर्चा केली होती. त्यामध्ये मोहम्मद शामीचाही समावेश होता. त्या लाईव्ह सेशनमध्ये मोहम्मद शामीने त्याचा संघर्ष सांगितला. शामीने त्यावेळी जे काही सांगितले, त्याची चर्चा पुढे काही दिवस चालली होती.
तीन वेळा आत्महत्येचा विचार -
2015 च्या विश्वचषकावेळी दुखापत झाली. टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी तब्बल 18 महिने लागले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. दुखापतीवर मात करुन टीममध्ये परतणे तितके सोपे नाही. रिहॅब कठीण असते, त्याशिवाय कौटंबिक समस्याही सुरुच होती. आयुष्यात खूप काही सुरु होते. त्याचवेळी आयपीएल सुरु होण्याआधी 10 दिव माझा अपघात झाला.
माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मीडियात खूप काही सुरु होते. त्यावेळी माझ्या कुटुंबाने साथ दिली नसती तर क्रिकेट सोडले असते. त्यादरम्यान मी तीन वेळा आत्महत्या करण्याचाही विचार केला होता. पण त्यावेळी माझ्यासोबत कुणी कुणी नेहमीच असायचे.. घरच्यांनाही त्याबाबत कल्पना आली असेल. माझा फ्लॅट 24 व्या मजल्यावर होता, घरच्यांना मी तेथून उडी मारेन, असेच वाटत होते, असे शामीने इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये सांगितले.
'कुटुंबातील लोकांची साथ नसते तर भयंकर काही केले असते'
वाईट काळात कुटुंबियांची सोबत होती. घरचे सोबत नसते, तर कदाचीत मी चुकीचं काही केले असते. घरच्यांपेक्षा मोठी ताकद कोणतीच नाही. कोणत्याही अडचणीवर उपाय असतो, तू फक्त खेळण्यावर लक्ष दे, असे घरचे सांगत राहिले.. मला अजूनही आठवतंय त्यावेळी मी नेटमध्ये गोलंदाजी करायचो. धावायचो आणि व्यायामही करायचो. पण मी काय करतोय ते कळतच नव्हतं. मी प्रचंड अशा तणावाखाली होतो. सरावाच्या वेळी मला नेहमी वाईट वाटायचे. कुटुंबियांनी मला खेळावर लक्ष केंद्रीत करायला सांगत होते.त्या कठीम काळात माझ्यासोबत माझा भाऊ होता. माझ्यासोबत माझे काही मित्रही होते. मी हे कधीच विसरू शकत नाही. हे लोक नसते तर मी काहीतरी भयंकर केले असते, असे शामीने सांगितले होते.