मुंबई : वैयक्तिक आयुष्यात वादळ येऊनही न खचलेला, न डगमगलेला अन् मैदानावर विरोधी संघावर तुटून पडणारा राॅकस्टार मोहम्मद शमीच्या 'रुद्रावतार'मुळे टीम इंडियाचा फायनलमध्ये मार्ग प्रशस्त झाला. पहिल्या चार सामन्यांमध्ये बाकावर बसूनही चेहऱ्यावर किंचितही दु:ख न दाखवणारा शमी मात्र आपल्या क्षणाची वाट पाहत होता.
हार्दिक पांड्या जायबंदी होऊन बाहेर गेला, शार्दुलला बेंच दाखवल्यानंतर संघात दोन बदल झाले अन् शमी वादळाची सुरुवात झाली. त्याने न्यूझीलंडविरुद्ध आपली मोहीम सुरु करताना न्यूझीलंडविरुद्धच शेवट करत टीम इंडियाची फायनल पक्की केली. सेमीफायनलच्या महामुकाबल्यात तब्बल 7 फलंदाजांना माघारी धाडत अविश्वसनीय कामगिरी केली. शमीच्याच 33व्या षटकात पडलेल्या दोन विकेटने टीम इंडियाची वापसी झाली.
राॅकस्टार शमीच्या हाताचा जेव्हा आश्विन प्रेमानं चुंबन घेतो!
टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे मैदानात फायनल निश्चित केल्यानंतर जितका टीम इंडियाने जल्लोष केला, त्यापेक्षा ज्यादा जल्लोष क्रिकेटला धर्म मानणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांना सुद्धा केला. तसेच टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ आणि राखीव खेळाडू सुद्धा आनंदात न्हाऊन निघाले. वर्ल्डकपमध्ये अंतिम संघात संधी न मिळूनही मार्गदर्शकाची भूमिका चोख पार पडलेल्या आर. आश्विन आणि शमीच्या सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये न्यूझीलंडला सात हादर देणाऱ्या शमीच्या उजव्या हाताचे प्रेमाने चुंबन घेताना आर. अश्विन दिसून येत आहे. याच फोटोवरून टीम इंडिया एक संघ नसून फॅमिली असल्याची प्रचिती येते.
एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंतचा टीम इंडियाचा प्रवास
न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतल्यानंतर शमी अशा लयीत आला की, त्या सामन्यात त्याने पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि न्यूझीलंडला केवळ 273 धावांवर रोखले. भारतासाठी हे लक्ष्य फार मोठे नव्हते, त्यामुळे टीम इंडियाने 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात शमीची 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवड करण्यात आली. त्याने 10 षटकात 54 धावा देत 5 बळी घेतले.
टीम इंडियाच्या प्लेइंग-11 साठी शमीला पहिली पसंती नव्हती. त्यामुळेच 2023 च्या विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नाही. हार्दिक पंड्याची दुखापत आणि शार्दुल ठाकूरची सुमार कामगिरीमुळे त्याला संधी मिळाली. या संधीचा फायदा त्याने अशा प्रकारे केला की 2023 च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये त्याचे स्थान निश्चित झाले.
विराटच्या 50 व्या शतकापेक्षा जास्त चर्चा
शमीच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. क्रिकेट तज्ज्ञांपासून ते माजी दिग्गज गोलंदाजांपर्यंत शमीच्या गोलंदाजी कौशल्याच्या प्रत्येक तपशीलाचे विश्लेषण करत आहेत. अंदाज फक्त एकाच गोष्टीवरून लावता येतो की विराटच्या 50 व्या शतकापेक्षा शमीच्या 7 विकेट्सची जास्त चर्चा होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या