अहमदाबाद : टीम इंडियाने आज वर्ल्डकपच्या मुकाबल्यात (ICC Cricket World Cup 2023) पाकिस्तानला (India vs Pakistan) एकतर्फी मात दिली. पाकिस्तानला अवघ्या 191 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 30.3 षटकांत भारताने हे आव्हान करत वर्ल्डकपमध्ये सलग आठव्यांदा पराभवाची धुळ चारली. या सामन्यामध्ये पाकिस्तानला 191 धावांमध्ये गुंडाळतानाच अनेक विक्रमांची सुद्धा सुद्धा नोंद टीम इंडियाने केली.
पाकिस्तानविरुद्ध 2011 च्या वर्ल्डकपमध्ये नोंदवलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती
दोनशेच्या आत विरोधी संघांना गुंडाळण्याची किमया सर्वाधिक वेळा भारताने आपल्या नावे करतानाच आणखी एका पराक्रमाची नोंद केली आहे. योगायोगाने तोच पराक्रम 12 वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकप लढतीत झाला होता. त्यामुळे त्या पराक्रमाची भारताने पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली आहे. 2011मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारताच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते.
पाकिस्तानविरुद्ध 2011 च्या वर्ल्डकपमध्ये नोंदवलेल्या या पराक्रमाची पुनरावृत्ती झाली आहे. आज भारताच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेत पाकिस्तानला खिंडार पाडले. वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये पाच बॉलरांनी प्रत्येकी दोन विकेट घेण्याचा पराक्रम फक्त तीनवेळा झाला आहे. यामध्ये टीम इंडियाने हा पराक्रम दोनवेळा केला असून त्यानंतर न्यूझीलंडला ही कामगिरी करता आली आहे. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या पाच गोलंदाजांनी दोन विकेट घेत भारताच्या विक्रमाची बरोबरी केली होती. भारताने आज पाकिस्तानविरुद्ध आपल्याच पराक्रमाची पुनरावृत्ती तब्बल 12 वर्षांनी करून पाकिस्तानला मात दिली आहे.
दोनशेच्या आत खेळ खल्लास करण्यात टीम इंडिया मास्टर
दोनशेच्या आत विरोधी संघाला गुंडाळण्यात सुद्धा टीम इंडियाची आजवर मास्टर राहिली आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात भारताने आतापर्यंत अशी कामगिरी करताना तब्बल 26 वेळा विरोधी संघाला दोनशेच्या आत गुंडाळून आपला करिष्मा दाखवला आहे. ती कामगिरी तब्बल पाचवेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला सुद्धा करता आलेली नाही. त्यांनी हा पराक्रम 23 वेळा केला आहे, त्यानंतर न्यूझीलंडचा नंबर लागतो. त्यांनी 21 वेळा अशी कामगिरी करताना विरोधी संघाला दोनशेच्या आत गुंडाळले आहे. तसेच चालू वर्ल्डकपमध्ये दोन संघाना दोनशेच्या आत गुंडाळण्याचा पराक्रमही टीम इंडियाने केला. भारतासाठी आजची कामगिरी स्वप्नवत अशीच राहिली. भारताच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यासमोर पाकिस्तानचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही. त्यामुळे एकंदरीतच या सामन्यांमध्ये भारताची कामगिरी दमदार राहिली. अवघ्या 36 धावांमध्ये पाकिस्तानने आठ फलंदाज गमावले. त्यामुळे पाकिस्तान डाव पाहता पाहता दोन बाद 155 अशा धावसंख्येवरून सर्व बाद 191 असा कोलमडला.