अहमदाबाद : उत्कंठा लागून राहिलेल्या वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक अशा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात भारताने एकहाती वर्चस्व राखताना पाकिस्तानला अवघ्या 191 धावांमध्ये गुंडाळले. पाकिस्तानची स्थिती एकवेळ 2 बाद 155 अशी भक्कम होती. त्यामुळे पाकिस्तान भक्कम धावसंख्या उभारून काही चमत्कार करतो का? अशी शंका लाखभर प्रेक्षक उपस्थित असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लागून राहिली होती. मात्र, कुलदीप यादवने 33 व्या षटकांत दोघांना तंबूत धाडल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला, तो नंतर सावरलाच नाही. 


दोनशेच्या आत खेळ खल्लास करण्यात टीम इंडिया मास्टर


भारताने ही कामगिरी करताना अनेक विक्रमाला गवसणी घातली. दोनशेच्या आत विरोधी संघाला गुंडाळण्यात टीम इंडियाची आजवर मास्टर राहिली आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात भारताने आतापर्यंत अशी कामगिरी करताना तब्बल 26 वेळा विरोधी संघाला दोनशेच्या आत गुंडाळून आपला करिष्मा दाखवला आहे. ती कामगिरी तब्बल पाचवेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला सुद्धा करता आलेली नाही. त्यांनी हा पराक्रम 23 वेळा केला आहे, त्यानंतर न्यूझीलंडचा नंबर लागतो. त्यांनी 21 वेळा अशी कामगिरी करताना विरोधी संघाला दोनशेच्या आत गुंडाळले आहे. तसेच चालू वर्ल्डकपमध्ये दोन संघाना दोनशेच्या आत गुंडाळण्याचा पराक्रमही टीम इंडियाने केला.  






भारताकडून सर्वच गोलंदाजांची कामगिरी दमदार 


दुसरीकडे, भारतासाठी आजची कामगिरी स्वप्नवत अशीच राहिली. भारताच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यासमोर पाकिस्तानचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही. त्यामुळे एकंदरीतच या सामन्यांमध्ये भारताची कामगिरी दमदार राहिली. अवघ्या 36 धावांमध्ये पाकिस्तानने आठ फलंदाज गमावले. त्यामुळे पाकिस्तान डाव पाहता पाहता दोन बाद 155 अशा धावसंख्येवरून सर्व बाद 191 असा कोलमडला.






भारताकडून सर्वच गोलंदाजांची कामगिरी दमदार राहिली. जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्यामुळे भारताने या सामन्यामध्ये पाकिस्तानला 191 धावांमध्ये रोखता आले. बुमराहची गोलंदाजी सर्वाधिक घातक राहिली. त्याने 7 षटकात एक षटक निर्धाव टाकताना 19 धावा देत दोन विकेट घेतल्या. त्यामुळे पाकिस्तानचे फलंदाजी कोलमडून पडली. 


इतर महत्वाच्या बातम्या