नाशिक : नाशिक (Nashik) शहर परिसरात अपघाताच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. अशातच मुलाला शाळेतून आई दुचाकीने घरी घेऊन जात असताना सिन्नरफाटा येथे उड्डाणपुलावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नांत पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक मारल्याने दहा वर्षांच्या मुलाचा दुभाजकावर पडून जबरी मार लागून मृत्यू झाला. पुन्हा एकदा खड्ड्यामुळे दहा वर्षीय मुलाला जीव गमवावा लागल्याने खड्ड्यांचा (Potholes) प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


नाशिक (Nashik District) जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अपघाताच्या (Accidents) घटना समोर आलेल्या आहेत. त्यामध्ये अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात झाले आहेत. अधिक एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. चेहेडी पंपिंग येथे राहणारा वरद गणेश चिखले जेलरोड येथील के.एन. केला शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वरदचा पेपर सुटल्यानंतर आई संगीता चिखले या दुचाकीवरून वरदला घेऊन शिवाजी महाराज पुतळा येथून उड्डाणपुलावर चढून सिन्नर फाटामार्गे घरी जात होत्या. सिन्नर फाट्याकडे जाताना उड्डाणपुलाच्या उतारावरील खड्डे चुकवत असताना पाठीमागून आलेल्या आयशर गाडीने दुचाकीला धडक दिल्याने आई संगीता व मुलगा वरद हे खाली रस्त्यावर पडले. 


दरम्यान वरद रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर पडल्याने त्याच्या डोक्याला व अंगाला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी जखमी वरदला तत्काळ सिन्नरफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र, डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने वरदचा दुर्दैवी अंत झाला. तर आई संगीता यादेखील जखमी झाल्या. या खड्डयांमुळे निष्पाप बालक वरदचा बळी गेला. वरद हा शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी गणेश चिखले यांचा मुलगा होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आयशर ट्रकचालक अहमद पटेल यास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाचव्या मजल्यावरून खाली पडून मजुराचा मृत्यू


नाशिक शहरातील वडाळा गावातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा गावात महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर गणाधीश अपार्टमेंट या नवीन इमारतीचे सहा मजल्यांचे बांधकाम सुरू आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गोविंद विजय मंडल हा बांधकाम मजूर पाचव्या मजल्यावर काम करीत असताना खाली पडून त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.


इतर महत्वाची बातमी : 


Pune Bengaluru Accident : भरधाव चारचाकीची ट्रकला मागून धडक, बहीण-भावासह तिघांचा मृत्यू, कराडजवळ भीषण अपघात