भंडारा : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'जर सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल सकारात्मक लागला कर एका दिवसांत मराठा आरक्षण मिळेल.' मराठा आरक्षणाबाबत ओबींसींचा आळ चुकीचा आहे असं बच्चू कडू म्हणाले आहेत. तर बच्चू कडू यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील निशाणा साधला.
'मराठा आरक्षणाबाबत ओबीसींचा आळ चुकीचा'
मराठा आरक्षणाबाबत ओबीसींचा आळ चुकीचा असून ओबीसींचं 10 टक्के आरक्षण वाढवून त्यात मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केलीये. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांचा उल्लेख होतो. म्हणजेच मराठा ही पदवी होती. त्यामुळे ओबीसींनी काहीही म्हणणं चुकीचं ठरेल. त्यापेक्षा दहा टक्के ओबीसींचं आरक्षण वाढवून त्यामधून मराठ्यांना आरक्षण द्यावं.' दिव्यांगांच्या महोत्सवासाठी बच्चू कडू यांनी भंडारा जिल्ह्यात हजेरी लावली होती. त्यावेळी माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया देताना ओबीसींवर भाष्य केलं.
हे सरकराचं अपयश - बच्चू कडू
दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी सरकारवर देखील निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'देशात हजार जाती आहेत.त्यात दोन वर्ग प्रमुख्यानं मोठे असून एक शेतकरी आणि दुसरा मजुर आहे. 75 टक्के शेतकरी प्रत्येक जातीत भेटतात अणि मजूर ही भेटतात. आरक्षण मागण्याची वेळ का आली, तर शेती मालाला भाव नाही. शेती मलाला भाव मिळाला असत तर नोकरी कोणी मागितली नसती. हे सगळं देण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे आरक्षणाचे मुद्दे समोर येत आहेत. नोकरीशिवाय दुसरी रोजगाराची संधी वाटत नाही. 75 वर्षात सगळ्या पक्षांनी अपयश शेतकऱ्यांच्या माथी मारलं. त्याचा हा परिणाम दिसतोय.'
'तर मराठ्यांना एक दिवसांत आरक्षण मिळेल'
'मनोज जरंगे यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. सरकार मराठ्यांना आरक्षण देणार यात काही शंका नाही. आरक्षण देण्यासंदर्भात शासन निर्णय आणि धोरण झालेलं आहे. सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका केली आहे. पण निर्णय येणं अजून बाकी आहे. तिथे जर निर्णय मराठ्यांच्या बाजूने आला तर त्यांना एका दिवसात आरक्षण मिळेल', अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
सदावर्ते संशोधक आहेत - बच्चू कडू
आमदार बच्चू कडू यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील निशाणा साधला. सदावर्ते हे खूप संशोधक आहेत. ते तज्ञ पण आहेत. त्यांनी कोणत्या कॅमेरामधून पवार साहेबांचा हात पाहिला की पाय पाहिला, तो कॅमेरा त्यांनी आम्हालाही दाखवावा, अशी मिश्किल टीप्पणी बच्चू कडू यांनी केली आहे.