(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinesh Phogat : वजनावर कंट्रोल ठेवायला हवं होतं; नियम हा नियम असतो, षडयंत्राचा सवाल नाही, दिनानाथ सिंग यांची प्रतिक्रिया
Vinesh Phogat : विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन स्पर्धेआधी 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Vinesh Phogat Paris Olympics 2024: भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) ने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरीमध्ये मजल मारली.मात्र अंतिम सामन्याआधी विनेश फोगाट (Vinesh Phogat) ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन स्पर्धेआधी 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं. परंतु तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगत तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
तर या संपूर्ण प्रकरणावर कोल्हापूरातील माजी हिंदकेसरी दिनानाथ सिंग (Dinanath Singh) यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते परमेश्वराला मान्य नसतं. ती चांगली खेळत होती, ती लढणारी आहे. पण वजनावरती नियत्रंण राहू शकलेलं नाही. वजनात लढायचंय ते माहिती आहे पण, वजन प्रमाणात राखलं पाहिजे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुम्ही वजन कमी करत आहात, तर ते व्यवस्थित नियंत्रणात राखण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. सर्व गोष्टींवर कंट्रोल राहिलं पाहिजे. खाल्लं असेल काहीतरी त्यामुळे वजन वाढलं असेल. पेट्रोल घातल्याशिवाय गाडी कधीही चालत नाही,असंही दिनानाथ सिंग यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
सोबत गेलेल्या स्टाफने देखील काळजी घ्यायला हवी होती. एकदा श्यामराव साबळे यांनी एका मोठ्या स्पर्धेवेळी आईने दिलेले लाडू खाल्ले, त्यावेळी दोन लाडू खाल्ल्याने त्याचं वजन 100 ग्रॅम जास्त वाढलं. वजन वाढलं की तुम्ही लढू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला ते कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. कुस्तीच्या आधी वजन तपासलं जाते. त्यामुळे तुम्ही पाणी जरी पिलं तरी तुमचं वजन वाढलं असं समजा. त्यामुळे तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
या प्रकरणात षडयंत्र झाल्याची शक्यता आहे का या प्रश्वावर बोलताना ते म्हणाले, षडयंत्र का होईल, भारताचा दुष्मन कोण आहे, कोण आणि का असं करेल, जो नियम आहे तो नियम आहे, त्याचं पालन केलं गेलं पाहिजे. आता काही नाही होऊ शकत. जराशी चूक मोठी शिक्षा देऊन गेली, त्यांच्यासोबत असलेल्या स्टाफने तिची काळजी घेतली पाहिजे होती, वजनावर नियंत्रण ठेवायला हवा होता, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.