(Source: ECI/ABP News/ABP Majha)
French Open 2021 : नोवाक जोकोविचनं रचला इतिहास; अंतिम लढतील त्सिटिपासचा पराभव करत जिंकला 19वा ग्रँडस्लॅम किताब
French Open 2021 : नोवाक जोकोविचनं इतिहास रचत 19वा ग्रँडस्लॅम किताब आपल्या नावे केला आहे. जोकोविचनं दुसऱ्यांदा हा किताब आपल्या नावे केला आहे.
French Open 2021 : जगातील नंबर एकचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत ग्रीक युवा खेळाडू स्टेफानोस त्सिटिपासचा पराभव केला आहे. पॅरिसमध्ये खेळवण्यात आलेल्या या अंतिम लढतीत जोकोविचने त्सिटिपासचा 6-7(6), 2-6, 6-3, 6-2, 6-4 ने पराभव केला. त्यासोबतच जोकोविचने आपल्या करिअरचा 19वा ग्रँडस्लॅम किताब आपल्या नावे केला आहे.
जोकोविचने फिलिप कार्टर सेंटर कोर्टवर चार तासांहून अधिक वेळ सुरु असलेल्या या फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत 6-7, 2-6, 6-3, 6-2, 6-4 ने त्सिटिपासचा पराभव करुन दुसऱ्यांदा हा किताब आपल्या नावे केला आहे.
त्सिटिपासनेही जोकोविचला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आणि पहिले दोन सेट 7-6, 6-2 नी आपल्या नावे केले. यावेळी प्रेक्षकांना असं वाटत होतं की, जोकोविचचा आता फ्रेंच ओपनची अंतिम लढतीत पराभव होणार. परंतु, जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोकोविचनं वापसी करत सामना आपल्या बाजूनं वळवला आणि पुढील तीन सेट आपल्या नावे करुन फ्रेंच ओपनच्या किताबावर आपलं नाव कोरलं.
उपांत्य सामन्यात नदालचा जोकोविचकडून परभाव
नोवाक जोकोविचने लाल मातीतील किंग राफेल नदालचं 14 वे फ्रेंच ओपन रेकॉर्ड जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. दुसर्या उपांत्य सामन्यात जोकोविचने चार सेटच्या सामन्यात नदालचा 3-6, 6-3, 7-6, 6-2 असा पराभव केला. चार तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या या सामन्यानंतर जोकोविच म्हणाला की नदालविरुद्ध जिंकणे आश्चर्यकारक आहे. फ्रेंच ओपनमधील माझ्यासाठी हा सर्वात अविस्मरणीय सामना आहे. फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचने लाल मातीच्या मैदानाचा बादशाह राफेल नदालचा पराभव करण्याची ही पहिली वेळ नव्हती. 2015 मध्येही नदालला फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचकडून पराभवाला सामोरे जावे लागले. सन 2016 मध्ये जोकोविच फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळविण्यात यशस्वी झाला होता.
जगातील सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक असलेला राफेल नदाल याअगोदर नंबर वन खेळाडू रॉजर फेडररचा विक्रम मोडण्याच्या उद्देशाने मैदानात आला होता. फेडरर आणि नदाल या दोघांनी आतापर्यंत 20-20 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. फेडररला हरवण्यासाठी आता नदालला पुढच्या फ्रेंच ओपनची वाट पाहावी लागेल.