Fifa WC 2022 : फुटबॉल विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. शनिवारी (3 डिसेंबर) पहिला बाद फेरीचा सामना खेळला गेला. या प्री-क्वार्टर फायनलमध्ये अमेरिका आणि नेदरलँड हे संघ आमने-सामने होते. सामन्यात नेदरलँड्सने अमेरिकेचा 3-1 असा पराभव केला. ज्यामुळे अमेरिकेविरुद्धच्या या विजयानंतर नेदरलँडचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला असून अमेरिकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 


नेदरलँड्सने 2014 फिफा विश्वचषकानंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. नेदरलँडचा संघ 2018 विश्वचषकात पात्र ठरू शकला नव्हता. नेदरलँड विरुद्ध अमेरिका सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नेदरलँड्सने अमेरिकेचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यातील पहिला गोल नेदरलँडच्या मेम्फिस डेपेने केला. मेम्फिस डेपेने 10व्या मिनिटाला हा गोल केला. यानंतर डेली ब्लाइंडने दुसरा गोल केला. ज्यामुळे हाल्फ टाईमपूर्वीच नेदरलँडने 2-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर हाजी राइटने अमेरिकेसाठी पहिला गोल केला. त्याने 76व्या मिनिटाला हा गोल केला. मात्र, अवघ्या पाच मिनिटांनंतर डेन्झेल डमफ्रीजने गोल करून नेदरलँडची आघाडी 3-1 अशी वाढवली. अखेरपर्यंत ही आघाडी कायम ठेवत नेदरलँडने सामने 3-1 अशा फरकाने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.






दुसरीकडे शनिवारी रात्री उशिरा 12.30 मिनिटांनी झालेल्या सामन्यात अर्जेंटिना संघाने ऑस्ट्रेलियाचा (Argentina vs Australia) पराभव करून फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. अटीतटीच्या या सामन्यात अर्जेंटिनाने 2-1 असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरी गाठल्याने आता नेदरलँडचा सामना अर्जेंटिना संघाशी होणार आहे. 9 डिसेंबरला अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे.


हे देखील वाचा-