FIFA Football World Cup 2022 : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) अर्जेंटिना (Argentina) संघाने शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव करून फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. अटीतटीच्या या सामन्यात अर्जेंटिनाने 2-1 असा विजय मिळवला. आता अंतिम-8 मध्ये अर्जेंटिनाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. नेदरलँड्सने प्री-क्वार्टर फायनलमध्ये अमेरिकेचा पराभव केला. 9 डिसेंबरला अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे.
मेस्सीची 1000 व्या सामन्यात दमदार कामगिरी
अर्जेंटिनासाठी या सामन्यात कर्णधार लिओनेल मेस्सी आणि युवा स्टार ज्युलियन अल्वारेझ ( Julian Alvarez ) या दोघांनी गोल केले. मेस्सीने 35व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल केला. मेस्सीचा हा 1000 वा सामना होता. 1000 व्या ऐतिहासिक सामन्यात गोल करत अर्जेंटिनाच्या संघाला विजय मिळवून दिला. मेस्सीने त्याच्या 1000 सामन्यांमध्ये 779 गोल आणि 338 असिस्ट केले आहेत. तसेच मेस्सीने त्याच्या पाचव्या विश्वचषकात नॉकआऊट सामन्यात पहिल्यांदाच गोल केला आहे.
अर्जेंटीनाचा गोलकीपर मार्टिनेजने बदलला सामन्याचा शेवट
मेस्सीच्या गोलमुळे अर्जेंटिनाचा संघ पहिल्या हाफमध्ये 1-0 ने पुढे होता. अल्वारेझने दुसऱ्या हाफमध्ये 57व्या मिनिटाला गोल केला. सामन्यात 77व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचे नशीब खुलताना दिसले. क्रेग गुडविनने फटका मारला तेव्हा बॉल अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसला लागला आणि गोलपोस्टमध्ये गेला. अशात फर्नांडिसने आत्मघातकी गोल केला. यानंतर इंज्युरी टाईमच्या शेवटी ऑस्ट्रेलियाला संधी मिळाली, मात्र अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमी मार्टिनेझने ती रोखून संघाला विजय मिळवून दिला.
अर्जेंटिना दहाव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत
अर्जेंटिनाचा संघ फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात दहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. आतापर्यंत अर्जेंटिना संघाला चार वेळा उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. 1966, 1998, 2006 आणि 2010 च्या शेवटच्या-8 सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा पराभव झाला होता. प्रत्येक वेळी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत अर्जेंटिना संघाचा अद्याप पराभव झालेला नाही. अर्जेंटिना संघाने दोन वेळा फिफा विश्वचषक जिंकला आहे, तर तीन वेळा संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.