Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) सध्या राऊंड ऑफ 16 चे सामने सुरु आहेत. आज राऊंड ऑफ 16 च्या दुसऱ्या दिवशी फ्रान्स विरुद्ध पोलंड आणि इंग्लंड विरुद्ध सेनेगल हे सामने रंगणार आहेत. शनिवारी झालेल्या सामन्यात अर्जेंटिना संघाने ऑस्ट्रेलियाला तर नेदरलँडने अमेरिका संघाला मात देत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. ज्यानंतर आज फ्रान्स, पोलंड, इंग्लंड आणि सेनेगल यांच्यातील दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार असून इतर दोन संघाचा विश्वचषकातील प्रवास संपणार आहे.

विशेष म्हणजे मागील तीन विश्वचषकात गतविजेता संघ ग्रुप स्टेजच्या सामन्यातून बाहेर पडत होता, पण 2018 चा विजेता संघ फ्रान्स राऊंड ऑफ 16 मध्ये पोहचत त्याने ही साखळी तोडली आहे. मागील 16 वर्षांत, फ्रान्स हा गतविजेता म्हणून राऊंड ऑफ 16 फेरीत पोहोचणारा पहिला संघ आहे. दुसरीकडे, पोलंडचा संघही तब्बल 36 वर्षांनंतर बाद फेरीत पोहोचला आहे. 2018 चा चॅम्पियन फ्रान्सचा या वेळीही विश्वचषक जिंकण्याच्या दावेदारांमध्ये समावेश केला जात आहे. पोग्बा, कान्ते आणि बेन्झेमासारखे स्टार खेळाडू नसतानाही फ्रान्स या विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे. दुसरीकडे पोलंडनेही चांगली कामगिरी केली असून स्टार खेळाडू लेवॉन्डस्कीवर अनेकांच्या नजरा आज असणार आहेत. त्यानंतर होणारा इंग्लंड आणि सेनेगल सामनाही चुरशीचा होण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा संघ कमाल फॉर्मात असून सेनेगलनेही चांगली कामगिरी केल्याने एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.

कधी होणार सामने?

आज होणारा पहिला सामना फ्रान्स विरुद्ध पोलंड भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता होणार आहे. त्यानंतर मध्यरात्री उशिरा 12.30 वाजता इंग्लंड विरुद्ध सेनेगल यांच्यात सामना पार पडणार आहे.   

कुठे पाहाल सामना?

भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

राऊंड ऑफ 16 चं वेळापत्रक:

सामना संघ तारीख वेळ ठिकाण
Round of 16: Match- 3 फ्रान्स विरुद्ध पोलंड 04 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता अल थुमामा स्टेडियमवर
Round of 16: Match- 4 इंग्लंड विरुद्ध सेनेगल 05 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता अल बेट स्टेडियम
Round of 16: Match- 5 जपान विरुद्ध क्रोएशिया 05 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता अल जनुब स्टेडियम
Round of 16: Match- 6 ब्राझील विरुद्ध कोरिया 06 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता स्टेडियम 974
Round of 16: Match- 7 स्पेन विरुद्ध मोरोक्को 06 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता एज्युकेशन सिटी स्टेडियम
Round of 16: Match- 8 पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड 07 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता लुसेल स्टेडियम

हे देखील वाचा-