(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्राचे खेळाडू सर्वोत्तम यशासाठी सज्ज, पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेला उद्या सुरुवात
शक्य आणि इच्छा असूनही काही व्यक्ती नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागल्याने या सगळ्या अनुभवापासून दूर असतात. पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेला उद्यापासून (10 डिसेंबर) सुरुवात होत आहे
नवी दिल्ली : पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेला उद्यापासून (10 डिसेंबर) सुरुवात होत आहे. शक्य आणि इच्छा असूनही काही व्यक्ती नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागल्याने या सगळ्या अनुभवापासून दूर असतात. पण, खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालयाने असा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवून देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेचा पडदा उद्या उघडला जाणार आहे. देशभरातील पॅरा खेळाडू त्यानंतर आपली प्रतिभा दाखवण्यासाठी मैदानात उतरतील. महाराष्ट्रातील खेळाडू देखील यात मागे नसून सर्वोत्तम यशासाठी उत्सुक व या स्पर्धा सुरु होण्याची वाट बघत आहेत. महाराष्ट्राला तिरंदाजी आणि नेमबाजीमधून देखिल अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीचा फायदा मिळणार आहे. आशियाई स्पर्धेचा अनुभव असलेला आदिल महंमद नाझिर अन्सारी हा रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राचे आशास्थान असेल. याशिवाय कम्पाऊड प्रकारात पूनम दुसेजा आणि अभिषेक ताव रे यांच्याकडूनही महाराष्ट्राला पदकाच्या आशा आहेत.
पॉवरलिफ्टिंग मध्ये देविदास झिटे (४९ किलो) आणि दिनेश बगाडे (१०७ किलो) आपले कौशल्य पणाला लावतील. पदकांची संख्या वाढवणारा आणखी एक प्रकार म्हणजे नेमबाजी या स्पर्धा प्रकारातही महाराष्ट्राला चांगल्या यशाची खात्री आहे. यामध्ये पॅरा ऑलिम्पिकच्या वाटेवर असलेला स्वरुप उन्हाळकर याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा बाळगल्या जात आहेत. राघव बारावकर, रेखा पडवळ आणि शंतनु हे देखिल आपला अनुभव पणाला लावणार आहेत
बॅडमिंटनमध्ये सोनेरी यशाची संधी
स्टार आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदम, निलेश गायकवाड, आरती पाटिल आणि लता हे बॅडमिंटनमधील महाराष्ट्राचे प्रमख आशास्थान असेल. उद्या रविवारपासून पहिल्या सत्रातील खेलो इंडिया पॅरा गेम्सला बॅडमिंटन स्पर्धा प्रकराने सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत या प्रत्येकाने आपली ओळख करुन दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सोनेरी यश दूर नाही इतका या संघाबाबत विश्वास व्यक्त करण्यात येतो.
अनुभवी खेळाडूंमुळे मोठ्या यशाची हमी - कान्हेरे
महाराष्ट्र बॅडमिंटन संघामध्ये आंतरराष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. सुकांत कदम, निलेश गायकवाड, आरती पाटील, कोमल आणि दिशा यांनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. सुकांत आणि निलेश गायकवाड यांच्याकडे पॅरालिंपिक स्पर्धेचाही अनुभव आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राला एकेरी आणि दुहेरी, मिश्र दुहेरीतकिताबाची सुवर्णसंधी आहे, असा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रहास कान्हेरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र संघ -
सुकांत कदम, आरती पाटील, निलेश गायकवाड, लता, जितेश राठी, कोमल ओस्तवाल, विजय कुमार निकम, दिशा, तुलिका जाधव, मार्क धर्माई, अनिल कुमार
दिलीप गावित ठरणार आकर्षण
अॅथलेटिक्स स्पर्धा प्रकाराला सोमवारपासून सुरुवात होईल. महाराष्ट्राचे २० सदस्यांचे पथक असून, या संघात अर्थातच दिलीप गावितचे आकर्षण राहणार आहे. दिलीप हा पॅरिस पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला धावपटू आहे. अनुभवाच्या जोरावर तो सोनेरी यश मिळवेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या संघाची जबाबदारी मुख्य प्रशिक्षक सुरेश काकड आणि पूनम नवगिरे यांच्यावर आहे. अॅथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पदके मिळतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू अभिषेक जाधवने व्यक्त केला.
महाराष्ट्र गाजवणार वर्चस्व - काकड
महाराष्ट्राचे धावपटू निश्चितपणे यंदाच्या पहिल्या सत्रातील स्पर्धेदरम्यान आपले वर्चस्व गाजवतील. या सर्व खेळाडूंमध्ये सोनेरी यशाचा पल्ला गाठण्यासाठीची प्रचंड गुणवत्ता आणि क्षमता आहे. संघाची कामगिरी लक्षवेधी ठरेल. यामुळे पदार्पणात महाराष्ठ्राला मोठे यश मिळेल. अचूक प्रशिक्षण आणि पुरेसा सराव यामुळे या पहिल्या वहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाघिक पदके मिळवून देण्यासाठी अॅथलेटिक्स संघ सज्ज झाला आहे, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक सुरेश काकडे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र संघ -
अभिषेक जाधव, अक्षय सुतार, अमोल,आशा पाटील,भाग्यश्री जाधव, दिलीप गावित, गीता चव्हाण, कृष्णा सेठ,मीनाक्षी जाधव, नलिनी डवार, प्रणव देसाई, प्रसाद पाटील, प्रयाग पवळे, सचिन खिलारी, संदीप सरगर,संगमेश्वर बिराजदार, शुभम, सुनील अनपटे, उलबगड सीताराम.