FIH Pro League Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एफआयएच प्रो हॉकी लीग सामन्यात अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव करून कालच्या पराभवाचा बदला घेतला. भारताला काल अर्जेंटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 1-3 असा पराभव पत्करावा लागला होता. 


युवा मिडफिल्डर हार्दिक सिंह 17व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच 20व्या मिनिटाला तरुण ड्रॅग-फ्लिकर जुगराज सिंहनेही गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारत 2-0 फरकानं आघाडीवर होता.


अर्जेंटिनानं तिसऱ्या क्वार्टरमधून पुनरागमन केलं. मिडफिल्डर आणि फॉरवर्डची भूमिका बजावणाऱ्या अनुभवी डेला टोरे निकोलसनं 40व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर गमावला नाही आणि अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला. तिसरा क्वार्टर चांगल्या पद्धतीनं संपवल्यानंतर अर्जेंटिनानं चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरच्या सुरुवातीला गोल करत स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला.


युवा फॉरवर्ड टॉमस डोमनं 51व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकमध्ये बदल केला. दरम्यान, 52 व्या मिनिटाला जुगराजनं आणखी एक गोल करून संघाला पुन्हा 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, 56व्या मिनिटाला फॉरवर्ड फेरेरो मार्टिननं अप्रतिम गोल करत स्कोअर पुन्हा 3-3 असा बरोबरीत आणला. पण अनुभवी फॉरवर्ड मनदीप सिंहनं 60व्या आणि शेवटच्या मिनिटाला शानदार गोल करून सामना पेनल्टी शूटआऊटमधून वाचवून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.


या विजयासह भारत आठ सामन्यांत 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, या यादीत  नेदरलँड्सचा संघ अव्वल स्थानी आहे. अर्जेंटिना सहा सामन्यांत 11 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha