India vs Argentina Men's Hockey Pro League : भारतीय पुरुष हॉकी संघाला FIH हॉकी प्रो लीगमध्ये आणखी एक पराभव स्वीकारावा लागला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारतीय संघाचा शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव केला. निर्धारित वेळेपर्यंत सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. भारताकडून गुरजंत सिंहने 38व्या मिनिटाला आणि मनदीप सिंहने 60व्या मिनिटाला गोल केले. अर्जेंटिनासाठी निकोलस अकोस्टाने 45व्या मिनिटाला आणि निकोलस कीननने 52व्या मिनिटाला गोल केला.


टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय संघासाठी सामन्याची सुरुवात चांगली झाली, पण शेवट मात्र वाईट झाला. शूटआऊटमध्ये भारतीय संघाचा स्ट्रायकर फ्लॉप ठरला. अभिषेक, गुरजंत आणि सुखजित सिंह शूटआउट चुकले. केवळ हरमनप्रीत सिंहला गोल करण्यात यश आले. दुसरीकडे, कीनन, टॉमस डोमेने आणि लुकास तोस्कानी यांनी अर्जेंटिनासाठी शूट-आऊटमध्ये यश मिळवले.


या विजयासह अर्जेंटिना संघ एक बोनस गुणही मिळवून पाच सामन्यांतून 11 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर, भारतीय संघ सात सामन्यांतून 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. दुसरा सामना आज होणार आहे.


असा होता स्पर्धेचा थरार
अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली. सामन्याच्या पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व होते. हरमनप्रीत सिंहने भारतीय संघासाठी अनेक संधी निर्माण केल्या मात्र त्यांचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. अर्जेंटिनाच्या फॉरवर्डनेही काही संधी निर्माण केल्या मात्र भारताचा गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकने चांगला बचाव केला.


अर्जेंटिनाला सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला जो व्यर्थ गेला. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले मात्र गोल होऊ शकला नाही. सुरुवातीच्या दोन्ही क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक खेळ दाखवत प्रतिस्पर्धी बचावाला दडपणाखाली ठेवले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha