Stock Market : गेल्या तीन आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. सध्या दोन्ही देशांतील युद्धाचा चौथा अठवडा सुरू असून या आठवड्यातही रशिया-युक्रेन युद्धाची परिस्थिती जास्त बदलण्याची शक्यता नाही. याबरोबरच एलआयसी आयपीओच्या तारखा या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करतील. या सर्व गोष्टींमुळे येणाऱ्या काळात शेअर बाजारात थोडेफार चढउतार होतील. परंतु, खूप मोठे परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या आठवड्यात शेअर बाजार स्थिर राहिल, अशी माहिती जेष्ठ अर्थतज्ज्ञ चेंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak) यांनी एबीपी माझाच्या (ABP Majha) 'पैसा झाला मोठा'(Paisa Zala Motha) या कार्यक्रमात दिली.
गेल्या तीन आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांतील हा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा परिणाम होत आहे. शिवाय शेअर बाजारावरही या युद्धाचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करायची की नाही? याबाबत संभ्रमावस्था आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी गुंतवणूकदारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत शेअर बाजाराविषयी होणाऱ्या घडामोडींबद्दल माहिती दिली.
गुंतवणूकदारांच्या या संभ्रमावस्थेवर बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले, "24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. हा हल्ला अनपेक्षित होता. जगातील कोणत्याही देशाला रशिया युक्रेनवर हल्ला करेल असे वाटले नव्हते. त्यामुळे 24 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. परंतु, युद्धाच्या दुसऱ्या दिवसापासून भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले. रशिया आणि युक्रेननेही भारताला याबाबत राजनैतीक मदत केली. त्यामुळे लोकांमध्येही एक विश्वास निर्माण झाला आणि शेअर बाजार हळूहळू सावरू लागला."
"गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा शेअर बाजारावर परिणाम होत असला तरी मार्च अखेर या आर्थिक वर्षाचंही शेअर बाजारावर सावट आहे. युद्धातून अनिश्चितता असून काही धातूंच्या किमती वाढल्या आहेत. या बाबी आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अडचणीच्या ठरतील का? अशा आर्थिक मुद्यांभोवती या युद्धाची व्याप्ती आणि त्याचा शेअर बाजारावर परिणाम मर्यादित राहिला आहे,अशी माहिती चंद्रशेखर टिळक यांनी दिली.
ते म्हणाले, "रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी गुंतवणूकदारांचे दहा लाख कोटींचे नुकसान झाले. परंतु, युद्धाच्या दुसऱ्या दिवसापासून शेअर बाजार सावरू लागला. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीतही वाढ झाली. युद्धासह आर्थिक वर्षाचाही या काळात शेअर बाजारावर परिणाम झाला. परंतु, आर्थिक, भौगोलिक, बाजारपेठ आणि सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी भारताला पसंती दिली आहे. याबरोबरच गेल्या दोन वर्षांपासून भारताची सकारात्मक आर्थिक प्रगती होत असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षीत होत आहेत. यामुळे आगामी काळ शेअर बाजारासाठी चांगला राहण्याची शक्यता आहे."
महत्वाच्या बातम्या