Diksha Dagar Gold in Deaflympics 2021 : ब्राझीलच्या कॅसियस दो सूल या शहरात सुरु असलेल्या 24 व्या मूकबधीर ऑलिम्पिक (Deaflympics) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. भारताने आणखी एक सुवर्णपदक खिशात घातलं असून भारताची गोल्फर दिक्षा डागरने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. दिक्षा डागरने अंतिम फेरीत अमेरिकेच्या ऍशलिन ग्रेसचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे दिक्षाने याआधी टर्की इथे झालेल्या 2017 सालच्या मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये देखील रौप्यपदक मिळवल्याने दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारी ती पहिली गोल्फर ठरली आहे.
श्रवणदोष असणारी दिक्षाने वयाच्या सहाव्या वर्षापासून श्रवणयंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. पण बालपणीपासूनच खेळाची आवड असलेल्या दीक्षाने गोल्फ खेळात आजवर उत्तम कामगिरी केली आहे. 21 वर्षीय डावखुऱ्या दिक्षाने अनेक आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धांमध्ये महिला गटात अप्रतिम कामगिरी केली आहे. अनेक युरोपियन देशात तिने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये, दिक्षा टोकियो ऑलिम्पिकसाठी शेवटच्या क्षणी पात्र ठरली आणि डेफलिम्पिक आणि ऑलिम्पिक या दोन्ही खेळांमध्ये खेळणारी पहिली गोल्फर बनली आहे. 2019 च्या सुरुवातीलाच दिक्षाने दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली महिला ओपन गोल्फ स्पर्धाही जिंकली होती.
भारताची मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी
दीक्षाने ही सुवर्णकामगिरी करण्याआधीही भारतीय खेळाडूनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. भारताने याच मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन खेळात देखील सुवर्णपदक मिळवलं. भारतीय संघाने जपानच्या खेळाडूंना फायनलमध्ये 3-1 ने मात देत हे सुवर्णपदक मिळवलं. तसंच धनुष श्रीकांतने 10 मीटर एअर रायफल शूटींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं असून शौर्य सैनीने कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत आठ खेळाडूंमध्ये फायनल सामना खेळवला गेला होता.
हे देखील वाचा-
- Deaflympics 2022 : मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये भारताच्या धनुष श्रीकांतची सुवर्णकामगिरी, तर शौर्य सैनीने जिंकलं कांस्यपदक
- ICC Rankings: टी-20 मध्ये भारत नंबर वन! कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?
- IPL 2022 : लिव्हिंगस्टोनचा गुजरातविरुद्ध अफलातून षटकार; राशिदनं जाऊन चक्क लियामची बॅट तपासली, पाहा फोटो