हरिद्वार : आतापर्यंत तुम्ही हुंडा म्हणून सुनेकडे गाडी, रोख रक्कम वगैरे मागितल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. शिवाय मुलांवर पालक नाराज असल्याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहिली असतील. पण हरिद्वारमध्ये लग्नाला अनेक वर्षे उलटूनही नातवंड न मिळाल्याने पालक आपल्या मुलावर आणि सुनेवर चिडले आहेत. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या वृद्ध दाम्पत्याने मुलगा आणि सुनेला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. वर्षभरात मूल जन्माला घाला नाहीतर पाच कोटी रुपये द्या, असं या दाम्पत्याने नोटीसमध्ये म्हटलं आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात 17 मे ही तारीख सुनावणीसाठी निश्चित केली आहे. परंतु या अजब प्रकाची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे.


नुकसानभरपाईसाठी कोर्टात अर्ज
संजीव रंजन प्रसाद आणि साधना संजीव प्रसाद असं या वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे. हरिद्वारच्या सिडकुल परिसरातील हरिद्वार ग्रीन कालोनीमध्ये ते राहतात. त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल केला आहे. 


डिसेंबर 2016 मुलाचं लग्न
डिसेंबर 2016 त्यांनी आपल्या मुलाचं लग्न नोएडामधील सेक्टर 75 मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत करुन दिलं. त्यांच्या लग्नाला साडेपाच वर्ष उलटूनही आपल्याला आजी-आजोबा बनण्याचं सुख मिळालेलं नाही. त्यामुळे नाराज दाम्पत्याने थेट कोर्टाच दार ठोठावत मुलगा आणि सुनेला कायदेशीर नोटीस बजावून मूल जन्माला घाला किंवा पाच कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून द्या, असं म्हटलं आहे. 


मुलावर आतापर्यंत बराच खर्च
या अर्जात दाम्पत्याने म्हटलं आहे की, "मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. 35 लाख रुपये खर्च करु पायलटच्या प्रशिक्षणासाठी त्याला अमेरिकेला पाठवलं. इतकंच नाही तर लग्न झाल्यानंतर मुलगा आणि सुनेला हनिमूनसाठी थायलंडला पाठवलं. सून आणि मुलाच्या आनंदासाठी 65 लाखांची ऑडी कार कर्ज घेऊन खरेदी केली." सध्या त्यांचा मुलगा एका प्रतिष्ठित एअरलाईस कंपनी पायलट कॅप्टन म्हणून कार्यरत आहे.


'मुलगा आणि सून कट करुन वेगळे राहतात'
या दाम्पत्याने आरोप केला आहे की, "हनिमूनवरुन परतल्यानंतर सून दररोज आपल्या मुलासह भांडण करु लागली. खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही तिने दिली होती. जेव्हा त्यांच्याकडे नातवंडाबाबत आग्रह केला तर दोघे कट करुन वेगवेगळे राहू लागले."


मुलगा आणि सुनेकडून प्रत्येकी अडीच कोटी रुपयांची मागणी
मुलगा आणि सुनेने आपल्याला आजी-आजोबा बनण्याच्या सुखापासून वंचित ठेवून मानसिक त्रास दिल्याचा आरोप या दाम्पत्याने केला. दाम्पत्याने कोर्टात याचिका दाखल करुन मुलगा आणि सुनेकडून प्रत्येकी अडीच कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे, जेणेकरुन आमची उपजीविका होईल. वर्षभरात बाळाला जन्म द्या किंवा पाच कोटी रुपये नुकसानभरपाई द्या, असं दाम्पत्याने आपल्या अर्जात स्पष्ट म्हटलं आहे.


सेटल झाल्यावर मुलं आई-वडिलांना विसरतात
एसआर प्रसाद यांचे वकील अरविंद श्रीवास्तव यांनी सांगितलं की, "पालक मुलांना त्यांच्या भविष्यासाठी वाढवतात, त्यांच्यावर पैसे खर्च करतात. पण मुलं स्थिरस्थावर झाल्यावर आपल्या वृद्ध आई-वडिलांना विसरतात.