Shubman Gill Jersey : भारताने झिम्बाब्वेला (IND vs ZIM) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश दिला. दरम्यान शेवटच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्रॅड इव्हान्स(Brad Evans) थेट शुभमन गिल याची जर्सी घेऊन पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शुभमनने संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करत मालिकावीराचा पुरस्कार मिळवल्यामुळे सर्वांनीच त्याचे कौतुक केले असून ब्रॅड ही त्याचा फॅन झाल्याचं सांगत प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याची जर्सी घेऊन पोहोचला. पत्रकार परिषदेत जर्सी दाखवत ब्रॅडने सांगितले की, तो शुभमन गिलच्या सर्वात फॅन्सपैकी एक आहे.


ब्रॅड म्हणाला, 'मी शुभमन गिल याचा एक मोठा फॅन आहे, म्हणूनच मला त्याची जर्सी मिळाली आहे. तो एक वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. तुम्ही पहिल्या सामन्यापासून त्याच्याकडे पाहून हे सांगू शकता. तो सिंगल रन घेण्यासाठीही शॉट मारताना अगदी जोरदार पद्धतीने आणि योग्य दिशेला मारतो. हे एक कौशल्य असून बऱ्याच काळाच्या सरावानंचतर येत असते. मी बऱ्याच काळापासून त्याचा फॅन असून आधी आयपीएल आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतही मी त्याला पाहिलं आहे.त्याला गोलंदाजी करणं एक शानदार असा अनुभव होता.'


अखेरच्या वन-डे मध्ये ब्रॅडची अप्रतिम गोलंदाजी 


ब्रॅड इव्हान्स याने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 54 धावा देत तब्बल 5 विकेट्स मिळवले. यामध्ये केएल राहुल, शिखर धवन, दीपक हुडा, शुभमन गिल आणि शार्दूल ठाकूर या महत्त्वाच्या फलंदाजांचा समावेश होता. दरम्यान शुभमननं ठोकलेल्या पहिल्या शतकानंतर ब्रॅडनेच त्याला बाद केलं असल्याने दोघांनी सामन्यानंतर एकमेकांची जर्सी एक्सचेंज केली.  


शुभमनचं पहिलं-वहिलं शतक


शुभमन गिल याने एकूण 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 30 डावानंतर पहिलं-वहिलं शतक झळकावलं आहे. अनेकदा 90 धावांवर बाद झाल्याने त्याच्यावर नर्व्हस 90 (Nervous 90) चा ठपका लागला होता. तो देखील धुवून निघाला आहे. शुभमनने भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 97 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकार ठोकत 130 धावा केल्या आहेत.  


हे देखील वाचा-