IND vs ZIM: शुभमन गिलचं (Shubhman Gill) तुफानी शतक आणि गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही झिम्बाब्वेचा पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश मिळवलं. या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं दिलेल्या 290 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या सिकंदर रझानं (Sikandar Raza) एकाकी झुंज दिली. या सामन्यात त्यानं 95 चेंडूत 115 धावांची खेळी साकारली. परंतु, झिम्बाब्वेला 15 धावांची आवश्यकता असताना तो बाद झाला आणि भारतानं हा सामना 13 धावांनी जिंकला. मात्र, या सामन्यात भारतीय संघाची धाकधूक वाढवणारा सिकंदर रझा कोण आहे? हे जाणून घेऊयात.


सिकंदर रझाचा दमदार फॉर्म
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावण्यापूर्वी सिकंदर रझानं बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही शानदार खेळ दाखवला. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सलग दोन सामन्यांत त्यानं शतक झळकावलं. एकदिवसीय व्यतिरिक्त सिकंदर रझानं टी-20 मालिकेतही आपला फॉर्म कायम ठेवला आणि 65 आणि 62 धावा केल्या. सिकंदर रझा सध्या त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळं आयसीसी जागतिक अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे.


सिकंदर रझाची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
सिकंदर रझाची झिम्बाब्वेच्या दिग्गज खेळाडूंमध्ये गणना होते. त्यानं झिम्बाब्वेकडून आतापर्यंत 17 कसोटी, 119 एकदिवसीय आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं अनुक्रमे 1187, 3511, 1040 धावा केल्या आहेत. त्यानं झिम्बाब्वेसाठी कसोटीत एक शतक आणि एकदिवसीय सामन्यात सहा शतकं झळकावली आहेत. त्यानं 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.


भारतानं 3-0 नं मालिका जिंकली
भारताचा सलामीवीर शुभमन गिलच्या 130 धावांच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करताना 289 धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघातील सुरुवात चांगली झाली नाही. पण झिम्बाब्वेच्या सिकंदरनं शतक झळकावत भारताला चांगलेच वेठीस आणलं होतं. झिम्बाब्वेला 15 धावांची गरज असताना सिकंदर 115 धावांवर बाद झाला आणि सामना भारताच्या बाजूनं झुकला. या सामन्यातील विजयासह भारतानं ही मालिका 3-0 अशी जिंकली.


हे देखील वाचा-